*येवला शहरात अवतरलेली विकास गंगा आणखी खळाळणार….*
*माजी खासदार समीर भुजबळ यांचा ठाम निर्धार*
*महायुतीचा वचननामा येवलेकरांच्या हाती सुपूर्द*
*येवला,:-* येवला शहर परिसरात गेल्या दोन दशकांपासून अवतरलेली विकासाची गंगा इथून पुढे आणखी खळाळणार आहे. स्वच्छ, सुंदर व प्रगतीशील येवला आम्ही घडविणारच आहोत. त्यासाठीच तब्बल ४० पानांचा सर्वंकष वचननामा आम्ही जनतेच्या हाती सुपूर्द करीत आहोत, असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. येवला नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, रिपाइं आणि घटक पक्ष महायुतीचा वचननामा भुजबळ आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र लोणारी यांच्या हस्ते येवलेकरांच्या हाती सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
माजी खासदार समीर भुजबळ पुढे म्हणाले की, येवला शहरात भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली विविध विकासकामे सुरू आहेत. काहींना मंजुरी मिळाली आहे, काही प्रगतीपथावर आहेत तर काहींना लवकरच मंजुरी मिळणार आहे. ही सर्व विकासकामे येवल्याला प्रगतीपथावर नेणार आहोत. येवल्यातील पैठणी विक्रेते, विणकरबांधव, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक, गाळेधारक, वाहतूकदार अशा सर्वांचाच विचार विकासनामा मध्ये करण्यात आला आहे, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, गेल्या पाच वर्षात भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात येवला शहर परिसरात जी विकासकामे झाली आहेत ती सुद्धा विकासनामा मध्ये नमूद करण्यात आली आहेत. तसेच, इथून पुढच्या काळात येवल्याचा चेहरा मोहरा कसा बदलेल, त्यासाठी कुठले विकास प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत या सर्वाचा साकल्याने विचार विकासनामामध्ये करण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, धनंजय कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, संभाजी पवार, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, भाजपचे पप्पू सस्कर, गुड्डू जावळे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दिपक लोणारी राजेश भांडगे, सचिन कळमकर, नवनाथ काळे, प्रविण पहिलवान, राजश्री पहिलवान यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भाजप, आरपीआय आ, महायुती मित्रपक्ष घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते व उमेदवार उपस्थित होते.


























