ई-पीक पाहणी अॅप ठप्प : शेतकरी हैराण

आन्वा | प्रतिनिधी

खरीप हंगाम २०२५ अंतर्गत सुरू असलेल्या ई-पीक पाहणी प्रक्रियेत शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने सुरू केलेल्या डीसीएस मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी नोंदणीची सुविधा उपलब्ध असली, तरी वारंवार सर्व्हर डाऊन होणे, लॉगिन समस्या व लोकेशन योग्य न दाखविणे या तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

शेतकरी तासन्तास शेतात फिरूनही माहिती सबमिट करू शकत नसल्याने त्यांचा वेळ, श्रम आणि मोबाईल डेटा वाया जात आहे. काही शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसणे किंवा अॅप वापरण्याचे तांत्रिक ज्ञान नसल्याने ते ऑनलाईन नोंदणीत मागे पडत आहेत. स्थानिक कृषी सहाय्यकांकडून मार्गदर्शन मिळत नसल्याचीही तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

खरीप हंगामासाठी १ ऑगस्टपासून सुरू झालेली ई-पीक पाहणीची प्रक्रिया १४ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील पिकांची माहिती नोंदवणे बंधनकारक आहे. पीक पाहणी नोंदणी केल्याशिवाय पिकविमा, अनुदान व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणे कठीण होणार आहे.

शासनाने कृषी क्षेत्रात पारदर्शकता आणि अचूक नोंदी ठेवण्यासाठी ही योजना राबवली असली, तरी तांत्रिक त्रुटींमुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *