लासलगांव, ( आसिफ पठाण ) :- लासलगांव बाजार समितीच्या खानगांव नजिक तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर सोमवार दि. 18 ऑगस्ट, 2025 रोजी फळे व भाजीपाला ह्या शेतीमालाची विक्रमी आवक झाली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप व उपसभापती संदीप (ललित) दरेकर यांनी दिली.
लासलगांव बाजार समितीने मौजे खानगांव नजिक, खडक माळेगांव, कोटमगांव, सारोळे खु., वनसगांव, उगांव, शिवडी, खेडे व परीसरातील इतर गावांमधील शेतकरी बांधवांच्या सोईसाठी मौजे खानगांव नजिक येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या जागेत गेल्या 04 ते 05 वर्षापासुन मिरची, इतर फळे व भाजीपाला ह्या शेतीमालाचे लिलाव सुरू केलेले आहे. दरवर्षी सदर शेतीमाल लिलावास व्यापारी व शेतकरी बांधवांकडुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याने दिवसेंदिवस सदर खरेदी-विक्री केंद्रावर मिरची, इतर फळे व भाजीपाला शेतीमाल खरेदी-विक्रीची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे.
त्यानुसार गेल्या 04 ते 05 वर्षाच्या तुलनेत सदर खरेदी-विक्री केंद्रावर सोमवार दि. 18 ऑगस्ट, 2025 रोजी फळे व भाजीपाला ह्या शेतीमालाची विक्रमी आवक होऊन सुमारे 550 वाहनांमधुन मिरची (हिरवी, पिकेडोर, ढोबळी, ज्वेलरी, बुलेट), काकडी, वाल, घेवडा, भोपळा, वांगी, कारले, दोडके, गिलके, आले, कोबी, फ्लॉवर, मेथी, कोथंबीर अशा विविध प्रकारच्या फळे व भाजीपाल्याच्या 28,241 बॅग विक्रीस आल्या होत्या. विक्रीसाठी आलेल्या सर्व शेतीमालाचे वेळेत लिलाव, वजनमाप व चुकवती इ. प्रक्रिया पार पाडणेसाठी बाजार समितीचे सर्व अडते / व्यापारी, शेतकरी, कामगार वर्गाचे मोठे योगदान असल्याचे सभापती ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप यांनी सांगितले.
यावेळी बाजार समितीचे उपसभापती संदीप (ललित) दरेकर व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सदर खरेदी-विक्री केंद्रास समक्ष भेट देऊन शेतीमाल विक्रीसाठी आलेल्या आवकेचा आढावा घेऊन अडते, व्यापारी व कामगार वर्गास जलदगतीने लिलावाचे व वजनमापाचे कामकाज करून शेतकरी बांधवांना रोख चुकवती अदा करणेसाठी सुचना दिल्या. सदर प्रसंगी बाजार समितीचे लिलाव पुकारणार कामगार तुषार शेजवळ यांनी आलेल्या सर्व शेतीमालाचा लिलाव सलग पुकारला त्याबद्दल त्यांचा बाजार समिती, शेतकरी व व्यापारी वर्गाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
–
हि अभुतपुर्व आवक हा शेतकरी बांधवांचा विश्वास, अडते व व्यापाऱ्यांचा उत्साह, कामगार व गाडीचालकांचे कष्ट तसेच बाजार समितीच्या सेवक वृंदाचे अथक प्रयत्न यांचे फलित आहे.
या यशामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे लासलगांव बाजार समितीतर्फे हार्दिक अभिनंदन व आभार !!!
ज्ञानेश्वर (डी. के. जगताप), सभापती,


























