नाशिक, दि. १५ ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर उम्मीद फाउंडेशन नाशिकतर्फे पेठ तालुक्यातील हरणगाव येथील माध्यमिक शाळेतील १३० विद्यार्थ्यांना नवीन दप्तरांचे वाटप करण्यात आले.
ही शाळा आदिवासी दुर्गम भागात असून येथे १०० टक्के आदिवासी मुले-मुली शिक्षण घेत आहेत. सुमारे ९० टक्के विद्यार्थ्यांचे पालक मजुरी करून आपल्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहेत. आर्थिक परिस्थिती कठीण असूनही या विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरली आहे.
शाळेने ८वी, ९वी आणि १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी दप्तरांची मागणी केली होती. त्यानुसार उम्मीद फाउंडेशनतर्फे ही गरज पूर्ण करण्यात आली. स्वातंत्र्य दिनी या विद्यार्थ्यांच्या हाती नवीन दप्तर देत त्यांच्या शिक्षण प्रवासाला नवी दिशा आणि ऊर्जा देण्यात आली.
“शिक्षण हेच खरे स्वातंत्र्य असून या उपक्रमातून मुलांच्या स्वप्नांना नवी पंख लाभले आहेत,” असे उम्मीद फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.

























