चांदवड (कीर्ती गुजराथी) –
मोठमोठ्या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात घडत असल्याने मनमाड-मालेगाव महामार्गावरील चोंढी घाट मृत्यूचा सापळा बनला आहे. घाट तसेच महामार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना वाहने चालविणे जिकरीचे होत असून घाटात सातत्याने वाहतूक कोंडीचा अनुभव येत आहे. प्रवाशांसह दवाखान्यात प्रसुतीसाठी जाणार्या गर्भवती महिला रुग्णांसाठी हा मार्ग मोठा धोकादायक होत चालला आहे. या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करुन चौपदरीकरण व रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी राज्य मल्हार सेनेचे सरचिटणीस, कानडगावचे माजी सरपंच मच्छिंद्र बिडगर यांनी केली आहे.
इंदूर, पुणे व बंगळुरूकडे जाणार्या महामार्ग क्रमांक १२ वरील चोंढी घाटात गेल्या वर्षभरापासून वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. मात्र हा महामार्ग संपूर्ण खड्ड्यांनी व्यापला असल्याने तसेच घाटातील अरुंद रस्ता यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. वाढती वाहनांची संख्या व महामार्गावरील खड्डे पहाता घाटामध्ये २४ तास वाहतूक कोंडी होत असते. यामध्ये विशेषत: दवाखान्यामध्ये प्रसूतीसाठी जाणार्या महिलांना वेळेवर पोहोचता येत नाही. तसेच काही रुग्णांना तत्काळ दवाखान्यामध्ये पोहोचविणे आवश्यक असताना रुग्णांना घेऊन जाणार्या रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत असल्याच्या घटना घडत आहेत.
या घाटामध्ये मोठमोठे खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात छोटे-मोठे अपघात तर नित्याचेच झाले आहेत. यामध्ये आत्तापर्यंत काहींनी आपले जीव गमावले आहे. कारण वाहनधारकांना कुठला खड्डा टाळावा हेच कळत नाही. त्यामुळे वाहनांचे स्पेअर पार्ट तुटणे, टायर पंचर होणे, तसेच घाटामध्ये जागेवरच तीव्र चढ असल्यामुळे गाडी थांबते, आणि थांबलेली गाडी पुढे चढाव करण्यासाठी नेली असता मशिनरीचे पार्ट तुटणे यांसारख्या कारणांनी सातत्याने अपघात घडत आहेत. ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला उभी करणे व अपघातात रस्त्यावर उलटलेल्या गाड्या अर्ध्या रस्त्यातच दीर्घकाळ राहत असल्यामुळे कायमच वाहतूकीचा खेळखंडोबा होत असतो. वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना तासन्तास जागेवरती थांबून राहावे लागते. त्यांना पाणी, जेवणाची व्यवस्था होत नाही. या महामार्गाची तत्काळ दुरुस्ती करून चौपदरीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांत होत आहे.
—-
अवजड वाहनांमुळे रस्त्याची दुरवस्था; चौपदरीकरणाची मागणी-
कानडगाव फाटा ते चोंडी गावापर्यंत दररोज एक ना एक अपघात घडत असून कुणालातरी दुखापत होत असते. या महामार्गावरून मोठमोठी अवजड वाहने जात असतात. पवनचक्कीच्या मोठमोठ्या पात्यांचीही वाहतूक होत असल्याने अपघातांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. शासनाने तात्काळ या महामार्गाची तसेच चोंढीं घाटातील दुरुस्ती आणि चौपदरीकरण तातडीने करावे, अशी मागणी सर्व वाहनधारक आणि नागरीकांनी केली आहे.
—-
फोटो – चोंढी घाट व मनमाड-मालेगाव महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे.

























