आपण वापरलेला शब्द एखाद्याचे भविष्य उज्वल करतोय की त्याच्या जीवनात अंधकार आणतोय हे पाहायला हवं. त्यासाठी बोलण्यापूर्वी विचार करणं गरजेचं आहे. कारण हे शब्द एखाद्या शस्त्रासारख्या असतात. या शब्दातून जसा एखादा घडू शकतो, तसाच एखादा बिघडूही शकतो. कोरड पडलेल्या मनावर किंवा इतरांच्या दुःखावर आपल्या शब्दांनी फुंकर घालून त्याचं आयुष्य सावरू देखील शकतो, असे प्रतिपादन प. पु. प्रवीणऋषीजी म. सा. यांनी केले.
परिवर्तन चातुर्मास २०२५ निमित्त आयोजित प्रवचन मालेत ते बोलत होते. प. पु. प्रवीणऋषीजी म. सा. म्हणाले, मनुष्य जीवनाला सगळ्यात मोठं लाभलेलं वरदान म्हणजे शब्द आणि त्या शब्दातून तयार होणारी भाषा. भाषा ही केवळ संवाद साधण्याचा माध्यम नसून विचारांची देवाण-घेवाण करण्याचे साधन आहे. आपले शब्द आपली भाषा आपण ऐकलेल्या, वाचलेल्या ज्ञानातून तयार होत असते. यासाठी केवळ वाचा किंवा वाणी असून उपयोग नाही तर त्यासाठी तयारीचा कान असावा लागतो. याचाच अर्थ श्रुतज्ञान म्हणजेच आपली श्रवण भक्ती उत्तम दर्जाची असणं गरजेचं आहे. आपण काय ऐकतोय आणि त्याप्रमाणे आपण काय आचरणात आणतो यावर आपलं व्यक्तिमत्व घडत असतं आणि आपली ओळख निर्माण होत असते. यासाठी स्वतःला थोडसं पडताळून पहायला हवं. दिवसभरात आपण कशा पद्धतीने बोलतो यावरून आपल्याला स्वतःची ओळख पटेल. जे भाव मनी असतात तेच मुखातून उमटत जातात. म्हणजेच जसे आपले चिंतन, आपले विचार आहेत तशीच आपली भाषा आपल्या वाणीतून येत असते. आपल्या शरीरात अंतर्बाह्य निर्माण होणारे विचार, भावना आणि शब्दातून त्याचं होणारं प्रकटीकरण यातूनच आपली भाषा कशी आहे, कोणत्या स्वरूपाची आहे हे समजत असते. वरदान म्हणून लाभलेली भाषा शाप देखील ठरू शकते.
प. पु. प्रवीणऋषीजी म. सा. म्हणाले, शब्द, भाषा हे केवळ शब्द नसून ती एक ऊर्जा असते ती एखाद्याचा आत्मविश्वास वाढवू शकते, उत्साह वाढवू शकते पण हेच शब्द जर फिरले तर ती एखाद्याची दिशाभूल देखील करू शकते. शब्द हे खूप महत्त्वाचे असतात. भरकटलेल्या मनावरला पुन्हा जागेवर आणण्यासाठी शब्दांचीच आवश्यकता असते. मुळात जन्माला आलेली कोणतीच व्यक्ती वाईट नसते. तिच्या आजूबाजूच्या वातावरणातून ती घडत असते. जी गोष्ट सत्य आहे त्याचा स्वीकार मन करेलच असे नाही. तुम्ही ती त्याला कोणत्या पद्धतीने सांगितली आहे यावर त्याची मानसिकता तयार होत असते आणि त्यातूनच तो आपलं मत तयार करत असतो. आपल्या तोंडून निघणारे शब्द किंवा भाषेमुळे कोणाच्या मनाला ठेचं लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. जेणेकरून त्याला आपल्याकडून दुःख,वेदना सहन करावे लागणार नाही किंवा पराभवाची वेळ येणार नाही. कारण जसं आपण इतरांसाठी पेरत असतो, तसंच आपल्या वाट्यालाही येत असतं. भाषेमुळे जसा जीवनात अंधकार पसरतो, तीच भाषा जीवनात प्रकाश सुद्धा निर्माण करते.






















