पंचवीस वर्षानंतर शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा; चांदवडला दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

फोटो- चांदवड येथील श्री नेमिनाथ माध्यमिक विद्यालयात  स्नेहमेळाव्यानिमित्त तब्बल २५ वर्षानंतर एकत्र आलेले सन १९९९-२००० च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थी व शिक्षक.

 

चांदवड (कीर्ती गुजराथी) –
येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सन १९९९-२००० च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा विद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी सुमारे ७० ते ८० विद्यार्थी-विद्यार्थीनींसह तत्कालीन शिक्षकही उपस्थित होते.
यावेळी माजी प्राचार्य सुभाष गुळेचा व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आल्यानंतर शालेय शिस्तीनुसार प्रार्थना व राष्ट्रगीत घेण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन भूषण हेडा, योगेश अजमेरा, अ‍ॅड. संग्राम थोरात, श्रीकांत धामणे, साखी मलोसे, सुधीर कबाडे, यशोदीप घमंडी यांनी केले. स्वागताचे फलक रेखाटन सचिन पाटील यांनी केले. यावेळी शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटलेल्या मित्रांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. तब्बल २५ वर्षानंतर मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने गप्पागोष्टी अन् जुन्या आठवणींमध्ये मित्र रममान झाले होते. जुन्या आठवणींनी हास्यकल्लोळ उडाल्याने जणू पुन्हा शाळेचा वर्ग भरल्याची अनुभूती येत होती. तर शालेय किस्यांनी वातावरण भावनीक झाले होते. आपल्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी आपल्याला घडविणार्‍या गुरुजनांना दिले. विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यत करत विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयास २१ हजार रुपयांची देणगी प्राचार्य शिवदास शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. मेळावा यशस्वीतेसाठी मुकेश राऊत, योगेश जाधव, नीलेश घुले, मंदाकिनी चौधरी, रोहीणी पाटील आदींनी परिश्रम घेतले. साखी मलोसे यांनी आभार मानले. सर्वांनी पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत एकमेकांचा निरोप घेतला.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *