सर्व धर्मात व घरात वृद्धाश्रमाचे महत्व वाढले?

ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाऊन, ओढग्रस्तीने संसार करत स्वत:च्या मुलाबाळांना वाढवले आहे… मोठे करुन स्वत:च्या पायावर उभे केले आहे.. अशा लोकांच्या अनेक मुलांनी अत्यंत हुशारीने वागून त्यांना वृध्दाश्रमाचा रस्ता दाखवला नाही, पण स्वत:च्या मुलांच्या जबाबदार्‍या… म्हातार्‍यांच्या अंगावर टाकून त्यांचा अनेकवेळा गैरफायदा घेतला आहे.. आणि घरातच नवे वृध्दाश्रम काढले आहेत. सोनेरी पिंजर्‍यात आई बापांना बंद करुन टाकले आहे आणि हक्काचे बिनपगारी नोकर बनवले आहेत….
आसपास घडणार्‍या काही घटना बघितल्या की अक्षरश: अंगावर काटा उभा रहातो. माझ्या माहीतीमधील कित्येक मुलांनी म्हातार्‍यांच्या वात्सल्याचा आणि प्रेमाचा गैरफायदा घेऊन, त्यांना ऊaवह fदr ुraहूा् धरुन स्वत:ची मुले त्यांच्या जबाबदारीवर टाकून, स्वत:च्या करीअरकडे लक्ष दिले आहे.
साधारणत: साठी, पासष्ठी नंतर मनुष्य मग तो स्त्री असो की पुरुष, इतक्या वर्षांच्या संघर्षाला थकलेला असतो, कंटाळलेला असतो, वैतागलेला असतो. मुले मोठी झालेली असतात, त्यांचे संसार सुरु झालेले असतात. या आयुष्याच्या संध्याछायेच्या कातरवेळी त्याला स्वत:साठी थोडा वेळ हवा असतो, विश्रांती हवी असते…पण नकळतपणे आणि अलगदपणे नातवंडांच्या जबाबदार्‍या पुनश्च अंगावर येऊन पडतात आणि तो पुन्हा गुरफटला जातो….
म्हातार्‍या आजीआजोबांना नातवंडांबद्दल अपार प्रेम आणि माया असते, नाही असे नाही. पण वयोमानामुळे, थकलेल्या शरीराने रोज नातवंडांना न्हाऊ माखु घालणे, जेवण देणे, त्यांच्या उस्तरवार्‍या करणे, त्यांना हवे नको ते पहाणे हे शक्य होईलच असे नाही. पण मुलांच्या इमोशनल ब्लॅकमेल खाली दबून जाऊन त्यांना हे स्विकारणे भागच होऊन जाते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार होतो. सेटल झालेला बिझी मुलगा, बक्कळ पगाराची सुनबाई यांना करीअरमधुन वेळ नसतो, मग आपल्या नातवंडांचे कसे होणार..? डे-केअरमध्ये त्यांची देखभाल कोण आणि कशी करेल..? दिवसभराची मोलकरीण ठेवली तर ती मायेने करेल का..? असे अनेक प्रश्न म्हातार्‍यांनाच पडतात आणि त्याभरात त्यांना स्वत:ला न झेपणार्‍या जबाबदार्‍या स्विकाराव्या लागतात….. एकदा जबाबदारी स्विकारली की, मग स्वत:चे आरामाचे वैयक्तिक आयुष्य नातवंडांच्या दावणीला बांधले जाते… लफ्फेदार ड्रेस घालून सुनबाई कार घेऊन कामाला गेल्या की नातवाला किंवा नातीला ब्रेकफास्ट बनवून देणे, त्याचा डबा भरुन देणे, त्याला स्कूल बस पर्यंत सोडायला जाणे, इथपासून ते दुपारी आडनिड्या वेळेला नातू किंवा नात शाळेतून परत आली की स्वत:ची वामकुक्षी टाळून त्याला आंघोळ घालणे, जेवायला देणे, झोपवणे ही कामे करावी लागतात. नातवंडांची इतकी प्रचंड काळजी घेऊनही जरा कुठे काही कमी जास्त झाले किंवा त्याची तब्येत बिघडली की…’लक्ष कुठे असते हो तुमचे..?’ किंवा ‘तुमच्या आईनेच काहीतरी खाऊ घातले असेल माझ्या पोराला.’ असे खडे बोलही ऐकावे लागतात म्हातार्‍यांना…
कधीकधी तर संध्याकाळी सून किंवा मुलगा आला की स्वत:चा लॅपटॉप उघडून बसतात आणि मग कधीकधी रात्रीच्या वेळी जेवणाचेही सासुबाईंनाच बघावे लागते…. सून असते हाय-क्वालिफाईड… त्यामुळे तिला बोलून चालणार नसते.. एखादा शब्द जर कमी जास्त झाला तर स्वत:चाच मुलगा डोळे वटारुन बघतो …. वर वर छान दिसणा़र्‍या आयुष्यांचे हे असले सोनेरी बंदीस्त वृध्दाश्रम आता जागोजागी दिसायला लागले आहेत. इथे सर्व सुखे हात जोडून उभी आहेत, पण विश्रांती नाही, जबाबदार्‍या संपलेल्या नाहीत. थकलेल्या शरीराला आराम नाही. अमेरिकेत मुलाकड? कौतुकाने गेलेले आईबाप चार महीन्यांनी उतरलेल्या चेहर्‍याने एअरपोर्टवर आलेले मी स्वत: बघितले आहेत. काल परवापर्यंत मुलाच्या अमेरीकन नोकरीचे कौतुक करणारे काका काकू यानंतर पुन्हा अमेरिकेला जायचे नावही घेत नाहीत, त्यामागेही हीच कारणे आहेत.
तुम्हाला मुले जन्माला घालून जर त्यांचे करणे झेपत नसेल तर एकतर नोकरीचा राजीनामा देऊन घरी बसा किंवा हृदयावर दगड ठेऊन मुलांना डे केअर सेंटरवर ठेवावे. तुमचं करीअर हेच जर तुम्हाला अतिशय महत्वाचे असेल तर मुलेच जन्माला घालू नका हे बेस्ट नाही का..? आपण जन्माला घातलेल्या मुलांची काळजी आपल्याच म्हातार्‍या आईबापांवर सोपवून स्वत: करीअरच्या नावाखाली नामानिराळे राहीलेल्या सुनामुलांची मला अक्षरश: कमाल वाटते.
हे नवे बंदीस्त सोनेरी वृध्दाश्रम आता साठीसत्तरीच्या वयातील वृध्दांसाठी यातनाकेंद्रे बनली आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. आणि यातील दुर्दैव म्हणजे या वृध्दांचा होत असलेला कोंडमारा हा असह्य असला तरी त्याची घनता किंवा तीव्रता ही शब्दात व्यक्त करता येत नाही हा सर्वात मोठा त्रास आहे….!!!
सचिन मधुकर परांजपे ( पालघर )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *