आकुर्डी-निगडी-प्राधिकरण श्री संघाच्या आयोजनात आणि पू. गुरुमाँ चंद्रकलाश्रीजी, वाणीचे जादूगार पू. स्नेहाश्रीजी म.सा. व मधुर स्वरांनी विभूषित पू. श्रुत प्रज्ञाश्रीजी म.सा. यांच्या पावन सान्निध्यात गुरु आनंद जन्मोत्सवाचे सप्तदिनी धार्मिक आयोजन सुरू आहे.
आजच्या धर्मप्रभावी कार्यक्रमात ‘आनंद चालीसा’ मंडळाच्या वतीने सामूहिक पठण करण्यात आले. या वेळी आपल्या उद्बोधनात साध्वी स्नेहाश्रीजी म.सा. यांनी प्रत्येकाने अहंकाराचा त्याग करून धर्मस्थानकात येण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, ‘सर्वांनी आपल्या क्षमतेनुसार चांगल्या संकल्पांची पूर्ती करावी, कारण सद्भावनेचा एक चांगला निमित्त हजारो लोकांमध्ये परिवर्तन घडवू शकतो.’ त्यांनी संकल्पसिद्धीसाठी एका तरुणाच्या त्यागाची हृदयस्पर्शी सत्य घटना सांगितली, ज्यामुळे संपूर्ण सभागृहातील श्रोत्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
आपल्या मधुर स्वरांत त्यांनी आचार्य भगवंतांच्या जीवनावर आधारित स्वतः रचलेले स्तवन सादर केले. आनंद चालीसा चे सुरेख सादरीकरण माधुरी भंसाली, सारिका ओस्तवाल, कविता नहार, संगीता मंडलेचा, राजश्री ओस्तवाल, राखी जैन, सलोनी गांधी, शुभांगी कात्रेला, मनिषा सोनिमिंडे, रेशमा मुथीयान, सरला गांधी या भक्तमहिलांनी केले.
आजच्या धर्मसभेत चंदनबाला रांका, संतोष कोठारी, मनिषा जैन, पायल मुथा व प्रसन्न नहार यांनी चार उपवासांचे प्रत्याख्यान घेऊन अठाई करण्याचा संकल्प केला.
९ ऑगस्ट रोजी भव्य आध्यात्मिक ‘रक्षाबंधन सोहळा’
साध्वी स्नेहाश्रीजी म.सा. यांनी ९ ऑगस्ट रोजी होणार्या भव्य व दिव्य आध्यात्मिक रक्षाबंधन कार्यक्रमाची घोषणा केली. या वेळी १२,५०० मंत्रजपांनी पूजित पवित्र राखी प्रत्येक भक्ताच्या मनगटावर बांधली जाणार आहे. अनेक धर्मप्रेमी कुटुंबांनी रजत व सुवर्ण राख्यांच्या भेटी देण्याची घोषणा केली आहे.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संघाचे अध्यक्ष सुभाषजी ललवाणी यांनी उपस्थित धर्मप्रेमींचे स्वागत केले, तर मंच संचालन शारदाजी चोरडिया यांनी केले.
मी पणा सोडल्याशिवाय स्थानकात आत्मिक शांती नाही : साध्वी स्नेहाश्रीजी

























