पुणे- श्री आनंद ऋषी गुरुदेव का पूज्य झाले? कारण ते अखंडतेचे पुजारी होते. एकेकाला जोडत जाणं हे त्यांचे मुख्य काम होते. आचार्य आनंऋषी हे अजातशत्रू होते,’ असे प्रतिपादन प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी केले.
परिवर्तन चातुर्मास २०२५ मध्ये आयोजित आनंदगाथा या प्रवचन मालेत त्यांनी गुरु कसा असावा, गुरुची महती कशी वर्णन केली पाहिजे, गुरूच महात्म्य काय असते हे कथन केले.
प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, निरंतर आत्मकार्य करत राहणं, निरंतर चिंतन करण, निरंतर ध्यान करण, एक क्षण ही वाया न घालवता काम करत राहणं हाच गुरुदेव आनंद ऋषीजी यांच्या उच्च जीवन पदाचा मार्ग आहे.
अनादर करणे आणि खंडण करणे म्हणजे नक्की काय हे सांगताना प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, मूर्ती कडे पाठ करणे हा मूर्तीचा अनादर आहे, तर मूर्तीचे भंजन करणे म्हणजे मूर्तीचे खंडन करणे किंवा तोडणे होय. मग मूर्तीचे भंजन करणे म्हणजे जणू परमात्म्याला, गुरूला तोडणे होय. उदाहरणं देताना ते म्हणाले समजा भारतीय परंपरेत मूर्ती थोडीशी जरी भंगली असेल, तर त्या मूर्तीची पूजा होत नाही. जी मूर्ती अखंड आहे त्याच मूर्तीची पूजा केली जाते. म्हणजेच ही साधना मुळातच अखंडतेची आहे. या अखंडतेच्या प्रवाहात अनेक विचारांची सर मिसळ होत असते. पण याचा अर्थ असा नाही की त्यातील सगळेच विचार आपल्याला पटतील. ज्ञान जरी सर्वत्र सारखे असले तरी त्याचे प्रकटीकरण मात्र वेगवेगळे असू शकते. उदाहरणादाखल त्यांनी पाषाणप्रभू यांनी आखलेल्या व्यवस्थेनुसार भगवान महावीर यांनी केवळ मार्गक्रमण केले नाही तर त्यात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला. केवळ पावलावर पाऊल टाकून चालणं हे शेळ्या मेंढ्याही करतात. पण ज्याचे चक्षु, ज्याची दृष्टी आगमची असते तेच पूज्य, गुरु, साधू ठरतात. यासाठी परिवर्तन घडवून आणणे महत्वाचे असते.
प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, परिवर्तन हा विरोध नसून तो सकारात्मक विचार आहे. आचार, विचार, क्रिया हे भिन्न, वैविध्यपूर्ण असू शकते पण जो माझ्यापेक्षा वेगळा विचार करतो तो माझा विरोधकच आहे. हा विचार मात्र जास्त घातकी ठरू शकतो. जो कोणी कोणावर लांच्छन लावत नाही, आरोप प्रत्यारोप करत नाही तो पूज्य असतो आणि म्हणूनच अशा पूज्य गुरु व्यक्तीचे कोणीही खंडन करत नाही. जो एका संताचा अनादर करतो तो संपूर्ण साधू परिवाराचा अनादर करतो. हेच जर एका संताचा आदर केला तर संपूर्ण संत परिवाराचा आदर केला असे होते.
प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, तुम्ही देत असलेल्या आदारामागील उद्देश काय आहे? नमन करण्यामागील लक्ष्य काय आहे? आणि चरण स्पर्शामागील ध्येय काय आहे? हे आधी ओळखा. एखाद्या साधुला, साध्वीला वंदन करताना तुमची भावना ही कायमच निरपेक्ष असू द्या. जेव्हा निरपेक्ष भावनेने तुम्ही त्यांना वंदन करता तेव्हा त्यांच्यातील गुण, सद्गुरु, सदाचार, सदविचार प्राप्त होतील.
गुरुकडून आपल्याला आपली भाषा कशी मधुर असावी, आपल्या संभाषणात गोडवा कसा हवा हे शिकायला मिळतं, गुरुच्या सानिध्यात राहून गुरुजी सांगत आहे ते फक्त ऐकून न घेता त्याचं परिपूर्ण रसग्रहण करता आलं पाहिजे. गुरुने जो उपदेश दिला आहे, निर्देश केला आहे. तसंच करा.
आचार्य आनंद ऋषीजी हे अजातशत्रू : प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.






















