प्रतिनिधी -कृष्णा गायकवाड (पिंपळगाव बसवंत)
जाबुटके गाव – 848 राष्ट्रीय महामार्ग जोड रस्ता निकृष्ट दर्जामुळे पूर्णतः खराब
जाबुटके गावातून बायजाबाई फाटा मार्गे 848 राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अंदाजे दीड किलोमीटरचा रस्ता काही दिवसांपूर्वीच तयार करण्यात आला होता. मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या काही दिवसांतच या रस्त्याची अवस्था चिंताजनक झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे तयार झाले आहेत.
या रस्त्यावरून शेतकरी, रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी, महिलावर्ग तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कंत्राटदाराने कमी प्रतीचे साहित्य वापरल्याची गंभीर तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
जाबुटके येथील बागायतदार शेतकरी विलास अपसुदे यांनी सांगितले,
“रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. काही दिवसांतच रस्ता उखडू लागल्याने आमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने तपासणी करून दोषींवर कार्यवाही करावी आणि दर्जेदार रस्ता तयार करून द्यावा.”
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष नामदेव गावित यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की,
“निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांमध्ये तीव्र असंतोष आहे. संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून योग्य दर्जाचे काम करून घ्यावे, अशी सर्वांची मागणी आहे.”
मनसे तालुका अध्यक्ष नामदेव गावित यांनी लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.

























