लासलगाव: (आसिफ पठाण)मराठी चित्रपटसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे सहाय्यक निर्देशक म्हणून ओळखले जाणारे संतोष मांजरेकर व कैलास केदारे यांनी चांदवड तालुक्यातील भोयगाव येथील श्री कचरनाथ जनार्दन स्वामी यांच्या जीवनपटावर आधारित चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी ते सोमवारी मांजरेकर लासलगाव नगरीत दाखल झाले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संतोष मांजरेकर यांनी सांगितले की, श्री कचरनाथ स्वामी महाराज यांचे गुरुबंधू, भक्तगण आणि संस्थान यांचा स्वामींच्या जीवनपटावर चित्रपट काढण्याचा मानस आहे. याच अनुषंगाने, चंपा षष्ठीच्या निमित्ताने भोयगाव येथे भरलेल्या यात्रा उत्सवाच्या दरम्यान त्यांनी तीर्थस्थळाला भेट दिली. दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांची श्री कचरनाथ स्वामी महाराज यांचे चिरंजीव कैलास केदारे यांच्यासोबत बाबांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपट बनवण्याविषयी चर्चा झाली. मांजरेकर यांनी सांगितले की, मी लहानपणापासून बाबांना पाहत होतो. त्यांचे दर्शन घेण्यासाठी दोन-दोन किलोमीटर लांब रांगा असायच्या.ते पुढे म्हणाले, बाबांच्या विचारसरणीवर व भाविकांना आलेल्या अनुभवांवर चर्चा करण्यासाठी लासलगाव येथे आलो आहे. भोयगाव येथील यात्रेत जाऊन भक्तांशी चर्चा करेन, ज्यामुळे चित्रपट काढण्यास मदत होईल. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, सुराज्य,बेधडक,’लकडाऊन’ यांसारख्या यशस्वी मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या संतोष मांजरेकर यांचा लवकरच फकिरीयत हा हिंदी चित्रपट येत आहे, जो हिंदी भाषेतील त्यांचा स्वतंत्र दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न असेल.
स्वामींच्या जीवनपटावर आधारित आगामी चित्रपटाबद्दल माहिती देताना मांजरेकर यांनी सांगितले की, चित्रपटाचे काही शूटिंग भोयगाव येथे, तर काही स्टुडिओमध्ये करण्यात येणार आहे. हा चित्रपट एका वर्षाच्या आत प्रदर्शित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
या पत्रकार परिषद मध्ये कैलास केदारे, रूपा केदारे व संतोष मांजरेकर उपस्थित होते.
*श्री कचरनाथ स्वामी महाराजांच्या जीवनपटावर चित्रपट :दिग्दर्शक संतोष मांजरेकर व कैलास केदारे यांनी केली लासलगावमध्ये घोषणा*


























