लासलगाव ग्रामपंचायतकडून घरपट्टी थकबाकीदारांना मोठा दिलासा; 50 टक्के सवलत जाहीर

लासलगाव(आसिफ पठाण)

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान–2025 अंतर्गत लासलगाव ग्रामपंचायतने घरपट्टी थकबाकीदारांसाठी मोठी सवलत जाहीर केली आहे.महिला सभा,मासिक सभा व ग्रामसभेच्या मंजुरीनंतर ग्रामपंचायतीने थकीत मूळ रकमेवर तब्बल 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेत परिपत्रक जारी केले आहे. विशेष म्हणजे, ही योजना 21 नोव्हेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या मर्यादित कालावधीतच लागू राहणार आहे.

अभियानाचा भाग म्हणून विशेष निर्णय ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या 13 नोव्हेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यभरात समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने लासलगाव ग्रामसभेने 20 व 21 नोव्हेंबर रोजी विशेष बैठका घेऊन हा निर्णय एकमताने मंजूर केला. गावाच्या महसूल वसुलीला चालना मिळावी आणि ग्रामपंचायतीची आर्थिक क्षमता वाढावी हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने स्पष्ट केले.

सवलत रक्कम,कालावधी किंवा अटींबाबत कोणताही आक्षेप असल्यास कर भरल्यापासून 15 दिवसांच्या आत ग्रामपंचायतीकडे लेखी स्वरूपात तक्रार सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.नियुक्त समितीचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.शासनाच्या या विशेष सवलतीचा लाभ घेऊन 31 डिसेंबर 2025 पूर्वी आपली थकीत घरपट्टी भरावी असे आवाहन सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी,कर्मचारी यांनी सर्व निवासी करदात्यांना केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *