सीमेवरचा डाव जिंकला, संसाराचा मात्र फुलण्याआधीच मोडला; पाटे येथील शहीद किशोर ठोके अनंतात विलीन; ‘अमर रहे’च्या घोषणांनी दुमदुमला परिसर

 

चांदवड (कीर्ती गुजराथी) –
पाटे ता. चांदवड येथील भारतीय सैन्यदलातील ५६ राष्ट्रीय रायफलचे जवान किशोर अंबादास ठोके (३०) यांच्यावर रविवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
किशोर ठोके यांना जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात कर्तव्यावर असताना दि. १२ रोजी वीरमरण आले होते. त्यांचे पार्थीव रविवारी (दि. १४) श्रीनगरहून ओझर येथे सैन्यदलाच्या विमानाने आणण्यात आले. त्यानंतर लष्कराच्या सजविलेल्या ट्रकमध्ये जन्मगावी पाटे येथे आणण्यात येऊन त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात तसेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लष्कर तसेच पोलीसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून किशोर यांना मानवंदना दिली. यावेळी ‘शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आपल्या लाडक्या जवानाला शेवटची मानवंदना देण्यासाठी परिसरातील गावातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.
किशोर ठोके हे १२ वर्षांपासून सीमेवर कार्यरत होते. दि. १२ रोजी कर्तव्यावर असताना तेथील प्रतिकुल हवामानाचा प्रचंड त्रास झाल्याने त्यांना वीरमरण आले होते. रविवारी ओझर येथे त्यांचे पार्थीव आणल्यानंतर चांदवड टोलनाक्यापासून पार्थीवाची फुलांनी सजविलेल्या लष्कराच्या ट्रकमधून मिरवणूक सुरु झाली. रस्त्यातील अनेक गावांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत मानवंदना दिली. यानंतर त्यांचे पार्थीव रहात्या घरी नेण्यात आले. यावेळी आई, पत्नी वैशाली, भाऊ तुषार व सागर यांनी एकच हंबरडा फोडला. कुटुंबीयाचा टाहो बघून उपस्थितांनाही शोक अनावर झाला होता. काही वेळ पार्थीव दर्शनासाठी घरी ठेवल्यानंतर रहात्या घरापासून गावाच्या मोकळ्या पटांगणापर्यंत मिरवणूक काढून या ठिकाणी किशोर ठोके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी लष्कराच्या अधिकार्‍यांनी पत्नी वैशाली व आईकडे तिरंगा, किशोरचा गणवेश व बुट सुपुर्द केले तर बंधू तुषार ठोके यांनी चितेला अग्नीडाग दिला. किशोर यांचे पार्थीव येणार म्हणून गावात सडा, रांगोळी काढण्यात आली होती. चौथराही फुलांनी सजविला होता. सध्या शेतीचा हंगाम जोरात सुरु असतानाही परिसरातील जनतेने आपली शेतीची कामे बंद ठेवून मोठी गर्दी केली होती.
यावेळी वीर जवान किशोर यांना पत्नी वैशाली ठोके, तहसीलदार अनिल चव्हाण, पोलीस निरीक्षक कैलास वाघ, गटविकास अधिकारी मच्छींद्र साबळे, जिल्हा सैनिक बोर्डाचे ज्ञानेश्वर रोडे, फस्ट मराठा लाईट रेजीमेंटचे कमांडींग अधिकारी, ५६ लेफ्टनंट कर्नल अरविंद, नाशिक सैन्य त्रिदल संघटनेचे अरुण गव्हाणे, नाशिक जिल्हा जय हिंद सैनिक संस्थेचे प्रदिप गुरव, येवला सैनिक संघटनेचे रमेश तनपुरे, चांदवड तालुका सैनिक संघटनेचे वाल्मीक पवार, वीर नारी माता महिला संघटनेच्या रेखा खैरनार, पाटेचे उपसरपंच उत्तम ठोके आदींनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, संदिप काळे, विलास भवर, अरुण देवढे, डॉ. नितीन गांगुर्डे, डॉ. शाम जाधव, शांताराम ठाकरे, अरुण न्याहारकर, गणेश निंबाळकर, वारकरी संप्रदायाचे बाळकृष्ण ठोके, नवनाथ पवार आदींसह प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
—-
पत्नी वैशालीच्या एका डोळ्यात हसू आणि दुसर्‍या डोळ्यात अश्रू-

किशोर ठोके यांना पत्नी वैशालीच्या पहिल्याच बाळंतपणासाठी सुटी मंजूर झाली होती. पत्नीचे गर्भारपणाचे दिवस पूर्ण होत आल्याने किशोर एक-दोन दिवसांत कुटुंबाला भेटण्यासाठी सुटीवर येणारच होते. परंतु काळ इतका निर्दयी बनला की किशोरची आणि पहिल्याच बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या पत्नी वैशालीची भेटच होऊ दिली नाही. आणि पहिल्या होणार्‍या बाळाचे मुखदर्शनही काळाने होऊ दिले नाही. ही भावनांची आणि मनाची ताटातूट इतकी विदीर्ण होती की प्रत्येक जण आतून अश्रू ढाळत होता. त्यामुळेच किशोरने सिमेवरचा डाव जरुर जिंकला, मात्र त्याचा संसारातील डाव फुलण्याच्या आधीच मोडला. पत्नी वैशाली ही येणार्‍या आठवड्यात पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याने तिच्या एका डोळ्यात हसू आणि त्याचवेळी पती किशोरचे सोडून जाणे यामुळे दुसर्‍या डोळ्यात अश्रू होते. तर होणार्‍या बाळाला आपल्या बापाचा चेहराही न बघता यावा यामुळे नियतीने इतके क्रूर व्हावयास नको होते अशी भावना उपस्थितांच्या चेहर्‍यावर दिसत होती.
——
फोटो- १) पती किशोर ठोके यांचे अखेरचे मुखदर्शन घेताना शोकमग्न पत्नी वैशाली.
२) हवेत बंदुकीच्या फैरी झाडून जवान किशोर ठोके यांना मानवंदना देताना लष्करी अधिकारी.
३) लष्करी अधिकार्‍यांनी तिरंगा ध्वज सोपवल्यानंतर त्याला कवटाळताना पत्नी वैशाली.
४) शोकमग्न पत्नी वैशाली व शोकमग्न आई.
५) अंत्यसंस्काराप्रसंगी उपस्थित लष्करी अधिकारी व जनसमुदाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *