सोलापूरच्या पिंकीला परत आणण्यात उपनिरीक्षक सूरज देवरे यांची मोलाची कामगिरी;
उमराणे गावामध्ये कौतुक!
उमराणे (वार्ताहर):
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरातून सहा महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या सोलापूरच्या एका चार वर्षीय चिमुकलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या मुलीला सुखरूप घरी आणून तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केल्याबद्दल मूळचे उमराणे येथील असलेले उपनिरीक्षक सूरज प्रवीण देवरे यांचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे.
🔍 शोधकार्याची कहाणी:
मे महिन्यात मुंबईत आलेल्या पिंकी (बदललेले नाव) नावाच्या मुलीचे २० मे रोजी CSMT परिसरातून एका तरुणाने अपहरण केले होते. पालकांनी तात्काळ तक्रार दाखल केल्यानंतर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपायुक्त प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर अपहरणकर्ता तरुण मुलीला घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बनारसकडे (वाराणसी) जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मुंबईपासून वाराणसीपर्यंतच्या प्रत्येक स्थानकावरील फुटेज तपासत पोलिस वाराणसीपर्यंत पोहोचले.
पोलिसांनी एकदा-दोनदा नव्हे, तर तीन वेळा वाराणसी गाठले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने अनेक प्रयत्न केले, मात्र आरोपी किंवा मुलीचा पत्ता लागत नव्हता. सप्टेंबरमध्येही पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते.
👉 ‘मराठी’ भाषा धावून आली:
वरिष्ठ निरीक्षक योगेश साबळे आणि श्रीकांत आदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ९ नोव्हेंबर रोजी उपनिरीक्षक सूरज देवरे आणि रामप्रसाद चंदवाडे यांचे विशेष पथक तिसऱ्यांदा वाराणसीला पाठवण्यात आले.
यावेळी पोलिसांनी आपली रणनीती बदलली. त्यांनी वाराणसी येथील स्थानिक प्रसारमाध्यमे आणि संस्थांची मदत घेण्याचे ठरवले. अपहरण झालेल्या मुलीचे फोटो माध्यमांना पाठवून मराठी भाषा बोलणारी एक लहान मुलगी बेपत्ता असल्याची माहिती प्रसारित केली.
यामुळे एक मोठा ‘ब्रेक’ मिळाला! ही माहिती समजताच एका स्थानिक पत्रकाराने पोलिसांना सांगितले की, मराठी बोलणारी एक मुलगी वाराणसी येथील काशी अनाथ आश्रमात आहे. पोलिसांनी तात्काळ आश्रम गाठले आणि तिथे त्यांना ती पिंकीच असल्याचे दिसून आले. बेवारस फिरणाऱ्या पिंकीला एका महिलेने स्थानिक पोलिसांकडे आणले होते, त्यानंतर तिला आश्रमात ठेवण्यात आले होते.
👉 आई-वडिलांना मुलीचा आधार:
पोलिसांनी पिंकीला सुखरूप मुंबईत आणले आणि तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. सहा महिन्यांच्या विरहानंतर आपल्या चिमुकलीला पाहून आई-वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी पोलीस खात्याचे मनःपूर्वक आभार मानले.
उमराणे गावात कौतुकाचा वर्षाव:
या यशस्वी कामगिरीबद्दल उपनिरीक्षक सूरज देवरे यांचे उमराणे गावात मोठे कौतुक होत आहे. प्रेस क्लब अध्यक्ष विनोद पाटणी, उपाध्यक्ष शरद पवार, ग्रामहीतवादी संघटना अध्यक्ष भगवान देवरे, उपाध्यक्ष राजेंद्र देवरे यांच्यासह अनेक नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
‘मराठी’ भाषेची किमया! ६ महिन्यांनंतर अपहृत चिमुकली सुखरूप घरी


























