हल्ली पाश्चिमात्य संस्कृती प्रमाणे अनेक दिन साजरे केल्या जात आहे.यामध्ये जागतिक मातृदिन हा 11 मे रोजी साजरा करण्यात येतो,मात्र भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यातील अंतिम दिवस अर्थात पिठोरी अमावस्येला “मातृदिन” साजरा करतात. वास्तविक पाहता एक दिवसाचा”मातृदिन”साजरा करणे ही आपल्या आईविषयी प्रकट केलेली अतिशय संकुचित भावना आहे.प्रत्यक्षात,आईसाठी प्रेम व्यक्त करण्याचा निश्चित असा दिवस नसायलाच हवा कारण,आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस त्या जन्मदात्रीमुळे आहे.अन तो तिच्यासाठीच हवा.असो ! व्यक्त होण्यासाठी जसं निमित्त असावं लागतं.तसंच या मातृदिनाच्या माध्यमातून आई विषयी भावना,प्रेम, माया,उपकार व्यक्त करण्याचा हा दिवस समजा.मात्र आभाळभर मायेच्या आईच्या प्रेमाचे गुण एका दिवसात अर्थात संकुचित करायला नको ही एक प्रेमळ इच्छा….!
आईची माया खूप व्यापक स्वरूपाची आहे.तिच्या मायेला, प्रेमाला काय उपमा द्यावी.अशावेळेस भल्याभल्यांची मती कुंठीत होते.मायेचा सागर म्हणावं तरी त्याला मर्यादा आहे.आभाळभर म्हणाव तरी ते सीमित आहे.मात्र प्रत्येक लेकरासाठी आईची माया ही त्यापलीकडची आहे.आई म्हणजे परमेश्वराचं दुसर रूपच…! देव आपल्यासमोर उभा केला जातो.तो साहित्याच्या माध्यमातून,मूर्तीच्या माध्यमातून,कथेच्या माध्यमातून…! मात्र आई आपल्या आयुष्यातील मूर्तिमंत देवता आहे.मान्य आहे.ईश्वराच्या अलौकिक शक्तीने समस्त ब्रम्हांड चालतं.त्याच्याविना झाडाचे एक पानंही हलत नाही.त्याचं अस्तित्व आहे.यात तीळमात्र शंका नाही.मात्र या पृथ्वीतलावरील देव कोण आहेत असं विचारलं तर आई आणि बाबा.आई म्हणजे सर्व शक्तिमान अशी शक्ती आहे. जिच्यामुळे आपले संपूर्ण जीवन चालते.तिच्या समर्पणाला अखिल ब्रम्हांडात तोड नाही आणि उपमाही नाही.कवी यशवंत दिनकर पेंढारकर तर,तिन्ही जगाचा स्वामीसुद्धा आईविना भिकारी आहे.असे म्हणतात. हे विधात्या!आम्हास माहित आहे.तू सामर्थ्यशाली आहे. तुझ्या अंगी सर्व शक्ती आहे. तू प्रत्येक गोष्ट निर्माण करू शकतो. घडवू शकतो मोडू शकतो.जर तुझ्यावर लडिवाळ प्रेम करणारी आई नसेल तर, हे सर्व सामर्थ्य सुद्धा आई च्या प्रेमापुढे थिटे पडेल.तुझी जन्मदात्री आई देवकी अन पालनपोषण करणारी आईची यशोदा तुला ठाऊक आहे.ही शक्ती केवळ आईच्या ठायी आहे.तिन्ही जगाचा अर्थात भूलोक म्हणजेच पृथ्वी,पाताळ म्हणजेच अधोलोक आणि देवलोक म्हणजे स्वर्ग.या तिन्ही लोकाचा स्वामी असला तरी,तो आईविना भिकारी आहे कारण जी माया प्रेम वात्सल्य तिच्या ठायी आहे ते इतर कुठेच नाही…!
आई म्हणजे आपल्या जीवनात अगरबत्तसारखी असते. ज्याप्रमाणे अगरबत्तीची काडी कणखर असते.त्याप्रमाणे ती सदैव आपल्या पाठीशी कणखर उभी राहते.अगरबत्तीला ज्याप्रमाणे गोमातेच्या शेण,चंदनाचा लेप लावतात.गुलाब,शेवंती मोगरा,जाई जुई अशा फुलांनी युक्त सुगंधित अशी अगरबत्ती परमेश्वरा जवळ अथवा घरामध्ये पेटवता.व त्याचा सुगंध घरभर पसरतो ज्याप्रमाणे आई सुद्धा तिच्या प्रेम,माया या सुगंधीरुपी फुलाने आपलं आयुष्य सुंदर बनवते.आपले संपूर्ण आयुष्य सुखी- समाधानी व्हावे,यासाठी झटते.तिचे सुगंधरुपी संस्कार आपल्या आयुष्याचा सोनं करतं.अक्षरश: शेवटच्या क्षणापर्यंत…! अगरबत्तीची राख होईपर्यंत जशी सुगंध देते त्याचप्रमाणे आपल्या मुलाच्या हितासाठी,कल्याणसाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणा पर्यंत आई झटत असते.
आई आपल्या जन्मापासून आपली सदैव काळजी घेते.शाळेची तयारी,जेवणाच्या डब्यातील आवडीनिवडी या तिलाच ठाऊक असतात. ती कधी आजारी पडली असे आठवतही नाही. आजारी असली तरी ती दुःख लपवून आपल्या काळजीसाठी तत्पर असते.तिचं प्रेम अगदी निस्वार्थी असतं.तिच्या मनात कधीच स्वार्थी भाव नसतो.तिच्या जीवनात दुःख आले असले तरी,आपल्या लेकराच्या आयुष्यात न येवो.अशीच तिची प्रार्थना असते.अगदी अडाणी असलेली आईसुद्धा आपल्या मुलाने शाळा शिकावी.मोठं व्हावं.म्हणून अभ्यास कर!मोठा साहेब हो! असं म्हणत राहते. तिला फक्त मुलाला साहेब होताना बघायचं असतं.तो किती पैसे कमावतो? किती पगार आहे?कधी विचारत सुद्धा नाही.फक्त तू सुखी रहा.सदैव हेच तिच्या मुखातून निघत असतं.तिच्यासाठी घेतलेली एखादी वस्तू”माझ्या लेकानं माझ्यासाठी आणली, म्हणून ती सर्व मैत्रिणींना,गल्लीत दाखवून मिरवत असते.कारण तिला त्याचं खूप कौतुक असतं.
असा हा श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे पोळा व पिठोरी अमावस्या.बऱ्याचदा असे दिसून येते,की अमावस्या म्हणजे अशुभ दिवस.मात्र,पौराणिक कथेनुसार या दिवसाला विशेष महत्त्व आहे.आपल्या भारतीय संस्कृतीत मात्र या दिवसाला अतिशय शुभ दिवस मानतात.कारण या दिवशी आई आपल्या मुलासाठी त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असते.थोडक्यात,सारांश रूपाने पौराणिक कथा अशी की, विदेह नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावस्येला पुत्रप्राप्ती व्हायची.मात्र ते मरण पावत असत.पतीच्या त्यागातून तिने कठोर तपश्चर्या केली.चौसष्ट देवतांनी दर्शन दिल्यानंतर ती पुन्हा घरी परत आली. देवतांच्या कृपेने तिला पुत्रप्राप्ती झाले व मागील सातपुत्र ही जिवंत झाले.यावरून असे दिसून येते की,आईचे आपल्या मुलांप्रती खूप समर्पण असते.यातून तिच्या सामर्थ्याची जाणीव होते.
आपल्या या भारतीय संस्कृतीतील पवित्र अशा या पिठोरी अमावस्या व मातृदिनाच्या समस्त मातांना खूप खूप शुभेच्छा…!
श्री विनोद शेनफड जाधव
मासरूळ जि बुलडाणा
मो नं 9763282077
भारतीय संस्कृतीचा मातृदिन-पिठोरी अमावस्या






















