पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा नगरपंचायत हद्दीतील राऊतवस्ती, मुळेवस्ती परिसरातील नागरिक आजही अंधारात जीवन जगत आहेत. संत तुकाराम महाराज विद्यालय ते रेणुका माता मंदिर या रस्त्यावर लाखो रुपये खर्चून विद्युत पोल उभारण्यात आले, मात्र अद्याप त्यावर विद्युत दिवे कार्यान्वित झालेले नाहीत. परिणामी नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या मार्गावर संत तुकाराम महाराज शाळेसह,समाजकल्याण विभागाचे मुलांचे आणि मुलींचे वस्तीगृह तसेच रेणुका माता मंदिर आहे. यामुळे येथे सतत वर्दळ असते. दिवसभर अभ्यास करून रात्री वस्तीगृहात परतणाऱ्या विद्यार्थ्यांना अंधारामुळे जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. महिलांनाही अंधारात ये-जा करताना असुरक्षिततेची भावना जाणवते.”पोल लावून काय उपयोग, जर दिवेच चालू होत नसतील?” असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. याबाबत तत्काळ पाठपुरावा करून विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी दिवे कार्यान्वित करावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी अपेक्षा संपूर्ण परिसरातून व्यक्त होत आहे.
पाटोदा नगरपंचायत हद्दीतील राऊतवस्ती, मुळेवस्ती रस्त्यावर लाखो रुपय खर्चूनही अंधारातच






















