दुसऱ्याचं दुःख जाणून घ्या : प. पु. प्रवीण ऋषीजी म. सा.

 

पुणे : इतरांचं दुःख समजू शकत नाही, दुःख ऐकू शकत नाही किंवा ऐकून घेण्याचा प्रयत्नही करत नाही, तो देवाचं वरदान देखील समजून घेऊ शकणार नाही. दुसऱ्याचं दुःख जाणून समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्या दुःखाचं कारण काय आहे ते जाणून घ्या. त्याला झालेल्या दुःखाचे निवारण करण्याचा प्रयत्न करा. दुःख समजून घेणं, दुःखात सहभागी होणं आणि त्याच निराकरण करणं ही एक प्रकारे खऱ्या अर्थाने साधना आहे. समोरच्याच्या दुःखाची जाणीव आपल्याला होत असूनही आपण त्याकडे कानाडोळा केला म्हणजेच त्या क्षणी आपल्या अंतरात्म्याचा आवाज आपण ऐकून न ऐकल्यासारखे आहे. असे प्रतिपादन प. पु. प्रवीण ऋषीजी म. सा. यांनी केले.
प. पु. प्रवीण ऋषीजी म. सा. म्हणाले, ज्या गोष्टीला प्रारंभ आहे त्याला कधी ना कधी शेवट हा असतोच. त्यामुळे कोणत्या गोष्टीचा प्रारंभ करावा आणि कोणत्या गोष्टीचा अंत करावा हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. सुख ही गोष्ट क्षणिक आहे. त्यामुळे सुखाचा प्रारंभ करण्याऐवजी आपण जर दुःखाचा अंत करण्याकडे अधिक बारकाईने पाहायला हवं. आयुष्यातील दुःखाचा शेवट केला तर त्यातून निष्पन्न होणारे परिणाम हे अधिक प्रभावी असतील. त्यामुळे ह्याकडे अधिक विचारपूर्वक दृष्टीने पाहूया. पुण्याची सुरुवात करण्याआधी पापाचा अंत करायला हवा. धर्माची सुरुवात करण्याआधी कर्माचा अंत करायला हवा. म्हणजेच ज्याचा आदि असतो त्याचा अंत असतोच आणि जे अनादी आहे ते अनंत चालतच राहत. दुःखाचा अंत झाला की पापाचाही अंत होतो. पापाचा अंत झाला की कर्माचा अंत होत असतो आणि कर्माचा अंत झाला की परिणामी जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होत असते.
आपलं हे शरीर अनंत जीवांचे बनलेलं एक शरीर असतं. या प्रत्येक जीवात समान आत्मा सामावलेला असतो. त्यामुळे समत्वदृष्टीने दुसऱ्याच्या वेदना, दुसऱ्याचं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. त्या जागी स्वतःला ठेवून पहावे म्हणजे त्याच्या दुःखाची जाणीव आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचलेली असेल. मात्र यासाठी स्वतः संवेदनशील असायला हवे.
समजा समोरच्याने आपला आवाज ऐकला नाही, तर आपल्याला तो आपला अपमान वाटतो किंवा त्याच्या अश्या वागण्याचे वाईट वाटतं. मग आपणच आपल्या आवाजाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? एक प्रकारे आपण आपलाच अपमान करत आहोत, असा त्याचा सरळ अर्थ होतो. स्वतःच्या आवाजाबरोबर इतरांचा आवाजही ओळखता यायला हवा. इतरांचं दुःखही जाणून घेता यायला हवं, त्यात स्वतःला सहभागी करून घेता यायला हवं. म्हणूनच पर्युषण पर्व, अंतगड सूत्र सांगिलेल्या गोष्टी अमलात आणायला हव्यात. त्यातून आयुष्याला योग्य कलाटणी मिळणार आहे. आपल्या आयुष्याला योग्य वळण लागणार आहे. आयुष्याला एक योग्य दिशा मिळेल. अशी जीवनशैली आचरणात आणल्याने आपल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पडतील. यासाठी केवळ स्वतःच्या भ्रमात न राहता तो भ्रम तोडून आपल्या अंतरात्म्याने आखलेली वाट आपलीशी करा. दुसऱ्याच दुःख आपलस करण्याचा प्रयत्न करा. आत्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या दुःखाचा अंत करताना इतरांच्याही दुःखाचा अंत करणे हा विचार किंवा ही क्रिया इतरांबरोबर स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणणारी मोठी प्रक्रिया ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *