——————————-
*मविप्रच्या विधी महाविद्यालयातील व्याख्यानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
——————————–
नाशिक :(कल्पेश लचके) न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन, न्यायालयाची बदनामी, न्यायप्रक्रियेत अडथळा आणणे किंवा चुकीची माहिती पसरवणे याबरोबरच सोशल मिडियावरील गैरवर्तन हेदेखील न्यायालयाचा अवमान करणारे आहे, असे प्रतिपादन नवजीवन विधी महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. समीर चव्हाण यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विधी महाविद्यालयात शुक्रवारी (दि.१) ‘कोर्टाचा अवमान आणि व्यावसायिक नैतिकता’ या अत्यंत महत्त्वाच्या व न्यायव्यवस्थेशी निगडित विषयांवर आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या संध्या गडाख होत्या. प्रा. मनोज पेखळे व प्रा. किरण क्षत्रिय यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
यावेळी डॉ. समीर चव्हाण यांनी आपल्या सखोल आणि विद्यार्थिप्रेमी शैलीत, ‘द कन्टेम्प्ट ऑफ कोर्टस अॅक्ट, १९७१’ अंतर्गत येणाऱ्या नागरी व फौजदारी अवमान प्रकारांवर उदाहरणांसह सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी अरुंधती रॉय प्रकरण (2002) व प्रशांत भूषण प्रकरण (2020) यासारख्या महत्त्वपूर्ण घटनांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे न्यायालयीन दृष्टिकोन समजावून सांगितला. तसेच, सोशल मीडियावरील गैरवर्तन कसे न्यायालयाचा अवमान ठरू शकते, यावरही त्यांनी विशेष भर दिला.‘प्रोफेशनल इथिक्स’ या भागात त्यांनी वकिली व्यवसायातील नैतिक मूल्ये, आचारसंहिता, न्यायालयीन कर्तव्ये व वकिलांची सामाजिक जबाबदारी यावर प्रभावी प्रकाश टाकला. भारतीय राज्यघटनेतील महत्त्वपूर्ण कलमांचे विश्लेषण करत विद्यार्थ्यांना न्यायशास्त्राच्या मूलभूत तत्वांबाबत जागरूक केले.व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. चव्हाण यांनी अतिशय समजूतदार आणि सोप्या भाषेत उत्तरे देत शंका दूर केल्या. या कार्यक्रमाला विधी शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी डॉ. चव्हाण यांच्या अभ्यासपूर्ण, समर्पक व प्रेरणादायी मार्गदर्शनाचे विशेष स्वागत व प्रशंसा केली.
सोशल मीडियावरील गैरवर्तनदेखील कोर्टाचा अवमान : प्रा. डॉ. समीर चव्हाण






















