लोणावळा (प्रतिनिधी) – वर्धमान स्थानकवासी श्रावक संघ, लोणावळा यांच्या पावन नगरीत बालब्रह्मचारिणी, मधुर व्याख्याणी, स्वर्ण संयम आराधिका महासती श्री ज्ञानप्रभाजी ‘सरल’ यांचा चातुर्मास प्रवेश सोहळा दिनांक ७ जुलै २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला.
सकाळी ८ ते ८.३० वाजेपर्यंत संचेती लॉन्स येथे भक्तांनी सजोडे जाप साधना केली, त्यानंतर भाविकांच्या विहार सोबत साध्वीजींनी सकाळी ९ वाजता श्री जैन स्थानकात मंगल प्रवेश केला.
स्थानकात काडसग्ग, प्रार्थना, प्रवचन, स्वागतगीत आणि बहुमंडलाने अष्टमंगलांची अप्रतिम प्रस्तुती सादर केली. सर्व कार्यक्रम भक्तिभावाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. यानंतर ‘नपकारसी’ चे आयोजन करण्यात आले, जिथे श्रद्धालूंनी सामूहिक रूपात आत्मशुद्धीसाठी सहभाग नोंदवला.
मंगलप्रवेशाच्या निमित्ताने अनेक श्रावक-श्राविकांनी आयंबिल तपश्चर्या अर्पण करून आपल्या श्रद्धेची प्रचिती दिली. बाहेरगावाहूनही मोठ्या संख्येने गुरुभक्तांनी या चातुर्मास प्रवेशासाठी लोणावळा गाठले. पुण्याहून पोपटशेट ओस्तवाल, डॉ. अशोकजी पगारीया, पुनमचंदजी पी.एच. जैन अशा अनेक मान्यवर भक्तगणांनी उपस्थिती लावून सत्संगाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन लोणावळा श्री संघाचे अध्यक्ष कांतीलालजी ओस्तवाल, सेक्रेटरी संतोष चोरडिया, खजिनदार विनोद लुंकड आणि संघातील सर्व कार्यकर्त्यांनी केले.
आनंद महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. संगीता भुरट, सेक्रेटरी निर्मला लुनावत, खजिनदार छाया सोनीग्रा, तसेच सविता भुरट, सुमिता लुनावत, आशा चोरडिया, ज्योती पारख यांसह सर्व महिला सदस्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रम अधिक उजळवला.
ही एक आध्यात्मिक उन्नतीची सुरुवात ठरावी, असा भाव प्रत्येकाच्या मनात दिसून आला. श्री ज्ञानप्रभाजी ‘सरल’ यांच्या चातुर्मासामुळे लोणावळ्याचे वातावरण चार महिन्यांसाठी पूर्णपणे साधना, संयम आणि आत्मजागृतीने भारले जाणार, हे निश्चित आहे.
ज्ञानप्रभाजी ‘सरल’ महासतीजींचा लोणावळ्यात ऐतिहासिक चातुर्मास प्रवेश


























