मनुष्य जीवनात दृष्टी आणि दृष्टिकोन हे फार महत्त्वाचे आहेत. या आपल्या सृष्टीतून आपण अनेक गोष्टी पारखत असतो आणि आपल्या आत सामावून घेत असतो. यासाठी जीवनात आपल्या आत आपल्याला काय सामावून घ्यायचे आहे आणि कशा प्रकारचे सामावून घ्यायचे आहे हे समजणे खूप गरजेचे आहे, असे प्रतिपादन प. पु. प्रवीणऋषीजी म. सा. यांनी केले.
परिवर्तन चातुर्मास 2025 मध्ये आयोजित प्रवचन मालेत ते बोलत होते.
प. पु. प्रवीणऋषीजी म. सा. म्हणाले, जेव्हा आपण आपल्या जीवन प्रवासात चालत असतो त्यावेळी ज्ञान, दर्शन, चरण या गोष्टींचा आपण आधार घेत असतो. या तीन गोष्टींचा आधार महत्त्वाचा आहे तसं या वाटेवरून चालताना आपली दृष्टी कुठे आणि कशी पोहचते हे पाहणेही महत्वाचे आहे. पुढे टाकण्यासाठी जेव्हा आपण पाऊल उचलतो तेव्हा जिथे पाऊल ठेवणार आहोत त्या जागी आधीच आपली दृष्टी पोहोचलेली हवी. जिथे दृष्टी पडतच नाही ते पाऊल उचलूच नये. आपल्या दृष्टीतून भूमी पावन होत असते. यामागे एक शास्त्रीय कारण आहे. आपल्या डोळ्यातून निर्माण होणारी किरणे ही ऊर्जा रुपी असतात आणि ती ऊर्जा आपण जिथे पाहू तिथे आधी पोहोचलेली असते. त्याचवेळी प्रक्षेपण आणि ग्रहण यांचं एकत्रित काम सुरू असतं. त्यातून देवाणघेवाणीची क्रिया होत असते. ती जर सकारात्मक पद्धतीने झाली तर त्याला कृपादृष्टी होणे असे म्हणतात पण तीच नजर जर कोरडी असेल तर आयुष्यात वादळ येणार हे नक्कीच. म्हणूनच दृष्टीत सामर्थ्य सामावलेले आहे. त्यांचे चक्षु आपल्या वाटेवर स्थिर झालेले आहेत आणि त्या वाटेवर आपले पाऊल पडत आहे तो यशस्वी होणार हे निश्चित. पण जर पाऊल कुठे ठेवायचं हे स्वतःमध्ये जर निश्चिती झाली नसेल तर मनात मात्र मोठी उलथापालथ होऊ शकते. कधी कधी आपण फक्त ऐकत असतो त्याच्याकडे पाहत नाही. त्यावेळी त्याचे शब्द फक्त कानावर आदळून गेलेले असतात. पण हे जर आपण त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिले त्याच्या नजरेला नजर देऊन ऐकले तर त्याने जे शब्दातून व्यक्त नाही त्याचे आकलन होते. जिथे तन आहे तिथेच मन असू द्या. त्यामुळे तुमचं लक्ष विचलित होणार नाही. कृती वेगळी शब्द वेगळे आणि विचार त्याहूनही वेगळा असं जर झालं तर त्यातून होणारे परिणाम गंभीर असू शकतात.
प. पु. प्रवीणऋषीजी म. सा. म्हणाले, खरंतर मनुष्य म्हणून आपण खूप नशीबवान आहोत. आपल्या शरीराला इंजिन म्हणून मन, विचार, बोलणं ही तीन इंजिन लाभलेली आहेत. ही तिन्ही इंजिनियर्स सर एका सरळ रेषेत चालली तर कुठलाही डोंगर आडवा आला तरी आपल्या चलबिचल होणार नाही. जे ध्येय गाठायचं आहे त्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. उदाहरणार्थ मुलांनी परीक्षा काळात अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे की येणाऱ्या मार्कांवर. समजा येणाऱ्या मार्कांवर लक्ष केंद्रित केले याचा अर्थ मन दृष्टी विचार विचलित झाले. यासाठी आपण जे आत्ता किंवा त्या क्षणी करतोय तिथे तुमचं अस्तित्व शंभर टक्के देण गरजेच आहे. यातूनच एकाग्रता साधली जाणार आहे. कारण मन हे रिक्त असतं. मनाचं लक्ष विचलित करण्यासाठी बाहेरच्या जगात अनेक गोष्टी घुसखोरांसारख्या उभ्या ठाकलेल्या असतात. मनाला स्वतःची भाषा नसल्याने तू बाहेरून ज्या गोष्टी टिपतो त्याच गोष्टी स्वतःमध्ये सामावून घेतो. त्यामुळे आपण त्यात काय भरतोय हे खूप महत्त्वाचं आहे. जे काही कराल त्याकडे संपूर्ण लक्ष द्या, एकाग्रता अंगी बाळगा, स्वतःमध्ये स्थिरता येऊ द्या या गोष्टी एका क्रमात आल्या तर आपल्या हातून चुका होणार नाहीत. जेणेकरून पापाची गती मंदावेल. पुण्य वाढीस लागेल. यातूनच आपले चरित्र म्हणजेच नामकर्म उज्वल होत जाईल.


























