चांदवड (कीर्ती गुजराथी) –
चांदवड नगरपरिषदेच्या सार्वत्रीक निवडणूकीसाठी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून ५ टेबलवर ७ फेर्यांमध्ये रविवारी (दि. २१) मतमोजणीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलींद कुलकर्णी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी दिली.
चांदवड नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासह सदस्यपदाच्या १९ जागांसाठी दि. २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते. तर प्रभाग ३अ च्या एका जागेसाठी शनिवारी (दि. २०) मतदान होत आहे. या सर्व मतमोजणीची व्यवस्था येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक टेबलवर १ सूक्ष्म निरीक्षक, १ मतमोजणी पर्यवेक्षक, १ मतमोजणी सहाय्यक याशिवाय अतिरिक्त पर्यवेक्षक व सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ५ टेबलवर ७ फेर्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. त्यात फेरी १ व २ मध्ये प्रभाग १ ते ५, फेरी ३ व ४ मध्ये प्रभाग ३ अ, फेरी ५ व ६ मध्ये प्रभाग ६, ७ व १० तसेच फेरी ७ मध्ये प्रभाग ८ व ९ ची मतमोजणी पूर्ण होणार आहे. सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. दुपारी २ पर्यंत सर्व निकाल हाती येण्याचा अंदाज आहे. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
—–





























