लासलगावकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार; जलजीवन मिशनच्या कामामुळे सहा दिवस पाणीपुरवठा खंडित

 

लासलगाव(वार्ताहर)

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन रेट्रो फिटिंग योजनेंतर्गत लासलगावसह परिसरातील १६ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे नूतनीकरण आणि सक्षमीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.या तांत्रिक कामांमुळे लासलगाव शहराचा पाणीपुरवठा पुढील सहा ते सात दिवस पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.अचानक उद्भवलेल्या या पाणी कपातीमुळे नागरिकांचे विशेषतः महिलांचे मोठे हाल होत असून परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सध्या सुरू असलेल्या कामाच्या स्वरूपाबाबत माहिती देताना प्रशासनाने स्पष्ट केले की,जॅकवेल ते शिंदे वस्तीपर्यंतची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.मात्र,आता शिंदे वस्ती ते विंचूर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतचे प्रलंबित काम हाती घेण्यात आले आहे.या दुसऱ्या टप्प्यातील कामात गाजरवाडी ते बोकडदरा रोड आणि कातकाडे वस्ती परिसरातील जुन्या जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे. यासोबतच इतर उप-जोडण्यांची कामेही एकाच वेळी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, जेणेकरून भविष्यात वारंवार पाणीपुरवठा खंडित करण्याची वेळ येणार नाही.

पाणीपुरवठा अचानक बंद झाल्यामुळे लासलगावमधील जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे.पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना खासगी टँकरवर पैसे खर्च करावे लागत आहेत किंवा साठवलेले पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे लागत आहे. घरगुती कामे आणि पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे.सध्या हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी मजुरांची संख्या वाढवण्यात आली असून, सहा दिवसांच्या कालावधीनंतर नियमित पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया

जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेली ही कामे लासलगावच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आहेत. सध्या नागरिकांना त्रास होत असला तरी, भविष्यात सुरळीत पाणी मिळण्यासाठी ही गैरसोय सहन करावी लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासन हे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असून काम संपताच पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल.

योगिता पाटील,सरपंच
लासलगाव

प्रतिक्रिया

पाणीपुरवठ्याचे काम होणे गरजेचे असले तरी, एवढ्या मोठ्या शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यापूर्वी प्रशासनाने नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था किंवा टँकरची पुरेशी उपलब्धता करणे आवश्यक होते

बाळासाहेब(छत्र)होळकर
सामाजिक कार्यकर्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *