सोनिया होळकर यांच्या हस्ते साहित्याचे पूजन
लासलगाव: निफाड तालुक्यातील काथरगाव येथे वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आवश्यक असलेल्या कीर्तनाच्या साहित्याची देणगी के.जी.एस. शुगरकारखान्याचे संचालिका तथा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ.सोनियाताई सत्यजित होळकर यांच्यामार्फत काथरगाव येथील ग्रामस्थांना देण्यात आली आहे. ह.भ.प. चैतन्य महाराज नागरे यांनी वारकरी संप्रदायासाठी कीर्तनाच्या साहित्याची मागणी केली होती, जी सोनियाताई होळकर यांनी पूर्ण केली.
या निमित्ताने काथरगाव येथे वारकरी साहित्याच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमप्रसंगी सौ.सोनियाताई होळकर यांच्या हस्ते या सर्व वारकरी साहित्याचे विधिवत पूजन करण्यात आले. या देणगीतील साहित्यामध्ये तबला, पेटी (हार्मोनियम), टाळ, पखावज आणि पारंपरिक कीर्तनांमध्ये वापरली जाणारी वीणा या महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश आहे.
पूजनानंतर सोनियाताई होळकर यांनी उपस्थित सर्व गावकरी व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या, वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. अध्यात्मिक विचारांचे संवर्धन आणि सामाजिक ऐक्य जपण्याचे कार्य या संप्रदायातून होते. या कार्याला हातभार लावणे हे आपले कर्तव्य आहे. ही देणगी केवळ साहित्य नसून, महाराष्ट्राच्या संस्कृतीवरील श्रद्धेची अभिव्यक्ती आहे.
या कार्यक्रमप्रसंगी अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने के.जी.एस. शुगर कारखान्याचे जनरल मॅनेजर शेटे साहेब, जनरल मॅनेजर शिंदे, सूरज होळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणजी निकम, ह.भ.प. चैतन्य महाराज नागरे उपस्थित होते. याव्यतिरिक्त, के.जी.एस. शुगरचे सर्व अधिकारी, कर्मचारी, तसेच काथरगावचे माजी सरपंच, उपसरपंच, वारकरी मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारकरी साहित्याच्या या योगदानामुळे काथरगाव येथे कीर्तनाचे कार्यक्रम अधिक उत्साहात पार पडण्यास मदत होणार आहे.


























