*लाईट सेटिंग,रेडियम,स्पीड गव्हर्नरच्या नावाने आर्थिक लूट बंद करा;नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन मागणी*
*वाहन पासिंग मशीन मधील तांत्रिक त्रुटीमुळे वाहतूकदारांचे नुकसान*
*नाशिक (आसिफ पठाण) :-* वाहन पासिंग क्षमता वाढवून मशीन मधील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करणे व पासिंग प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे यासह विविध प्रश्नांबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मुख्यत: पासिंग प्रक्रियेत होणारी लुट थांबविण्यात यावी अशी प्रमुख मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष पी.एम.सैनी, चेअरमन राजेंद्र फड ,सचिव बजरंग शर्मा,समस्या कमिटी चेअरमन महेंद्र राजपूत,उपाध्यक्ष शंकर धनवडे,सदाशिव पवार,तेजपाल सोडा,सतीश कलंत्री, संजू तोडी,भगवान कटीरा,गजानन सोसे,कृष्ण बेनिवाल,संभाजी जाधव,अशोक पवार,मोहन सिंग, सुरेश आहेर,सजन सिंग,दलबीर परधान,महावीर शर्मा, विजय बोऱ्हाडे,प्रवीण नागरे, गिरीश जोंधळे यासह पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन वाहन पासिंग मशीन द्वारे प्रक्रियेसाठी नव्याने स्थापित करण्यात आलेल्या मशीनरीमधून तपासणी करताना अनेक तांत्रिक त्रुटी स्पष्ट होत असून, त्याचा थेट फटका वाहतूक व्यवसायिकांना बसत आहे. पासिंग मशीनची क्षमता वाढउन किरकोळ तांत्रिक दोष दाखवल्यानंतर गाडी पासिंगमध्ये रिजेक्ट होत असून,अशा वाहनांना पुन्हा पासिंग मिळण्यासाठी तीन ते चार दिवस अडकवून ठेवले जात आहे. हे असताना त्या वाहनांसाठी पुन्हा स्वतंत्र फी आकारण्यात येत असल्याने वाहतूकदारांवर अन्याय होत आहे. नवीन यंत्रणेमुळे अपेक्षित गतीने तपासणी होण्याऐवजी आठ-आठ दिवस वाहन थांबून राहते ज्यामुळे त्याचे ऑपरेशन थांबते आणि माल वाहतूक तसेच आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे म्हटले आहे.
नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ व वाहन संख्या जास्त आहे म्हणून पासिंग साठी मर्यादा वाढउन टोकन वेळेवर मिळावे यामुळे विशेष उपाय योजना करावी कारण रस्त्यात आपलेच अधिकारी त्यावर कारवाई करून अनाठाइ दंडात्मक कारवाई करून वाहतूकदारांना त्रास देता हे त्वरित बंद करावे.याशिवाय लाईट सेटिंगसह इतर तांत्रिक अडचणी मशीनरीद्वारे दाखवल्यानंतर त्या दोषांची माहिती लगेच संबंधित वाहनधारकांना देऊन जागेवरच सुधारणा करण्याची संधी उपलब्ध व्हावी. परंतु दोष सांगण्यासाठीही विलंब केला जात असून, दोष दुरुस्तीनंतर तपासणीस पुन्हा येताना परत शुल्क आकारण्याची पद्धत अनुचित ठरते असे म्हटले आहे.
तसेच पासिंग मशीनमधून दाखविलेल्या तांत्रिक त्रुटी त्याच दिवशी व जागेवरच दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध करावी. ज्यांची पुन्हा तपासणी केली जाते,त्या वाहनांसाठी कोणतेही स्वतंत्र/अतिरिक्त शुल्क आकारू नये. वाहन पासिंग प्रक्रिया कमीत कमी कालावधीत पूर्ण व्हावी यासाठी योग्य मनुष्यबळ,तांत्रिक कर्मचारी व जलद प्रणाली उपलब्ध करावी. कोणतेही वाहन एक दिवसांपेक्षा जास्त अडवण्यात येऊ नये याविषयी स्पष्ट आदेश द्यावेत.पासिंग मशीनमधील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करून वाहतूकदारांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
वाहतूकदारांना व्यवस्थेच्या या असंख्य अडचणींमुळे नाशिक जिल्ह्यातील वाहने अन्य राज्यात नोंदणी करत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे करोडो रुपयाचे नुकसान होत आहे.याबाबत सविस्तर चर्चा अधिकाऱ्यांशी करण्यात आली. नवीन तांत्रिक प्रणालीचा उद्देश हा वाहनांची सुरक्षा तपासणे असला तरी त्या नावाखाली व्यापारी व वाहतूकदारांना आर्थिक तोटा होऊ नये व लाईट सेटिंग,रेडियम,स्पीड गव्हर्नरच्या नावाने ही आर्थिक लूट बंद करावी.हे सर्व विषय आपल्या कार्यालयाने तातडीने योग्य उपाययोजना करून कारवाई करावी व नाशिक जिल्ह्यातील वाहतूक क्षेत्रास दिलासा द्यावा नाहीतर येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन करू आणि याचे सर्व जबाबदारी आपली राहील असा इशारा देखील निवेदनात दिला आहे.

























