*पिंपळगाव नगरपरिषद निवडणूक : १०१ उमेदवारांचे अर्ज छानणीत अवैध, निवडणूक वर्तुळात खळबळ*

 

पिंपळगाव बसवंत(कृष्णा गायकवाड)
पिंपळगाव बसवंत नगरपरिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण होताच मोठा धक्का समोर आला आहे. नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या २६ अर्जांपैकी फक्त ५ अर्ज वैध ठरले असून नागरसेवक पदासाठीच्या १७५ अर्जांपैकी ५८ अर्ज वैध ठरले आहेत. एकूण १०१ उमेदवारांचे अर्ज विविध कारणांमुळे अवैध ठरल्याने उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

छाननीदरम्यान कागदपत्रांतील त्रुटी, अपूर्ण माहिती, आवश्यक पुराव्यांचा अभाव अशा कारणांमुळे अनेक अर्ज नाकारण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. विशेषतः काही अर्जांमध्ये संलग्न दस्तावेजांच्या विसंगतीमुळे ते तात्काळ अवैध घोषित करण्यात आले. यामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत अधिक काटेकोरपणा राखण्यात आल्याचे दिसून येत आहे.

नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात सुरू असून उमेदवारांतून मोठी चुरस अपेक्षित होती. मात्र छाननीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज अपात्र ठरणे ही अभूतपूर्व बाब मानली जात आहे. अनेक प्रभागांमध्ये आता स्पर्धा मर्यादित राहणार असून काही ठिकाणी थेट दोन ते तीन उमेदवारांमध्ये सरळ सामना रंगण्याची शक्यता आहे.

अर्ज छाननीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी असमाधान व्यक्त केले असून काही उमेदवार अपील दाखल करण्याची तयारी करत आहेत. पिंपळगाव बसवंतची निवडणूक आता नव्या घडामोडींमुळे अधिक रंगतदार होणार असून आगामी काही दिवसांत राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *