भुसावळ(गोपाळकुमार कळसकर)
भुसावळ: पक्षी सप्ताहानिमित्त चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगाव यांच्या मार्फत ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या दरम्यान निसर्ग संवर्धन विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा जलाशय व वन्य जीवांचा अधिवास म्हणून हतनूर जलाशयची ओळख आहे. येथे दरवर्षीप्रमाणे चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगाव (भुसावळ) यांच्या वतीने “पक्षी निरीक्षण व संवाद” हा विशेष उपक्रम पार पडला. या उपक्रमात परिसरातील तसेच स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण संस्थेमार्फत करण्यात आले.सदर पक्षीनिरीक्षणासाठी मार्गदर्शन पक्षी अभ्यासक तसेच चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी केले. त्यांनी उपस्थित पक्षीप्रेमींना विविध पक्ष्यांची ओळख, त्यांचे वर्तन, स्थलांतराची कारणे व जलाशयाचे पर्यावरणीय महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी पक्षीनिरीक्षणादरम्यान हतनूर जलाशय परिसरात अनेक स्थलांतरित पक्षी आढळले. त्यात विशेषतः शेंडी बदक , कॉमन पोचार्ड, वारकरी यांसारखे युरोप व आशियाई प्रदेशातून येणारे पक्षी आढळून आले. तसेच मार्श हॅरियर हा शिकारी पक्षीही दिसून आला, ज्यामुळे उपस्थित निरीक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला.या उपक्रमात सुमारे १५ हून अधिक पक्षीप्रेमी, पक्षीमित्र व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. सहभागी सदस्यांमध्येअनिल महाजन (पक्षी अभ्यासक), उदय चौधरी, समीर नेवे, स्वप्निल कुलकर्णी, वसंत पाटील, विद्या पाटील, विलास सोळुंके, सोळुंके मॅडम, डॉ. तुषार पाटील, मनोज बडगुजर, सुरेश ठाकूर, विलास महाजन आणि राहुल चव्हाण, जीत तुषार पाटील यांचा समावेश होता.या कार्यक्रमातून निसर्गाशी जवळीक साधण्याची आणि स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांविषयी जाणून घेण्याची सुंदर संधी मिळाल्याचे सहभागी सदस्यांनी सांगितले.सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगाव (भुसावळ) यांनी केले.संस्था दरवर्षी या जलाशय परिसरातील जैव विविधतेचा अभ्यास करून त्यासंबंधी माहिती वन विभाग व पर्यावरणीय विविध संस्थांना सादर करीत असते.


























