पारध शाहूराजे (महेंद्र बेराड) पारध शाहूराजे तसेच परिसरात पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला. श्रमसाथीदार बैलांविषयी कृतज्ञता व सन्मान व्यक्त करण्यासाठी शेतकरी बांधवांनी सकाळपासूनच आपल्या बैलांची विशेष सजावट करून त्यांची पूजा अर्चा केली.
सकाळीच शेतकऱ्यांनी बैलांना स्नान घालून त्यांना तेल, हळद लावून अंगास झगमगाटी रंग चढवले. बैलांच्या शिंगांना रंग लावून, गळ्यात फुलांचे हार, घागरमाळा , गोंडे, झुली व घंटा घालून त्यांना पारंपरिक रूप दिले. महिलांनी घरासमोर सुंदर रांगोळ्या काढून बैलांच्या पायपूजा करून त्यांना गोड नैवेद्य दाखवला.
परिसरातील शेतकरी बांधव आपल्या शेतातून बैलांना सजवून गावातील श्री गणेश मंदिर या ठिकाणी पोळ्यासाठी एकत्र येतात.ग्रामपंचायत पारध शाहूराजे येथे पारंपारिक पद्धतीने तोरण तोडून श्री तबडे यांच्या मानाच्या बैलाची पूजा सरपंच, सरपंच तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी केली.ढोल-ताशांचा गजर, पारंपारिक डफडे वादन, बोल बालासाहेब की जय, श्री पराशर महाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. लहान मुलांनी देखील बैलांसोबत खेळत, त्यांच्या अंगावर फुलांची उधळण करून उत्सवात आनंदाचा रंग भरला.
या दिवशी शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांना गुळ, पुरणपोळी,भात यांचा नैवेद्य अर्पण केला. बैल हे आपल्या श्रमाचे खरे साथीदार असून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय टिकून आहे, याची जाणीव प्रत्येक शेतकऱ्याने व्यक्त केली.
बैलपोळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून शेतकरी संस्कृतीचे प्रतीक आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ देणाऱ्या या जनावरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे. त्यामुळे गावागावात एकात्मतेचे, स्नेहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. किरकोळ वादाचे प्रकार वगळता शांततेत पोळा साजरा झाला. याप्रसंगी पारध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष माने साहेब, पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

























