आन्वा | प्रतिनिधी
आन्वा येथे पारंपरिक पद्धतीने बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचा आत्मीयतेने साजरा होणारा हा सण गावात एक आगळं-वेगळं वातावरण निर्माण करून गेला.
गावातील शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांना वेगवेगळ्या रंगांनी सजवले. बैलांच्या सिंगांना घागर मळा, फुलांचे हार, झगमगती सजावट करण्यात आली होती. त्यांच्या अंगावर विविध डिझाईन व संदेश रंगवून शेती संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले.
प्रत्येक घराघरांत बैलांचे पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. शेतकरी कुटुंबीयांनी या दिवशी बैलांना जेवण घालून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
गावात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या सणाचा आनंद लुटला. पारंपरिक खेळ, ढोल-ताशांचा गजर व लोकगीतांनी बैलपोळ्याचे वातावरण अधिक रंगतदार झाले.
शेती संस्कृतीला अधोरेखित करणारा आणि शेतकऱ्याच्या आयुष्याशी घट्ट नाळ जोडणारा असा हा सण आनंद, आपुलकी आणि उत्साहाचे प्रतीक ठरला.


























