पाटोदा *(गणेश शेवाळे)* आष्टी मतदार संघांचे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. समाजहितासाठी नेहमी पुढे असलेल्या खाडे यांच्यावर झालेल्या या निंदनीय हल्ल्याने पाटोदा तालुक्यात प्रचंड संताप उसळला आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ला होणे ही अतिशय गंभीर आणि कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी घटना असल्याचे नागरिकांचे मत आहे.हल्ल्याच्या घटनेनंतर नागरिक, सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना वाढली असून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. हल्लेखोरांनी केलेल्या या कृत्यावर त्वरीत आणि कठोर कारवाई न झाल्यास समाजातील असंतोष आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.या संपूर्ण घटनेचा निषेध म्हणून २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत पाटोदा बसस्टँड समोर निषेध आंदोलन करण्यात आले आहे. याच निषेधार्थ पाटोदा बंदचे आवाहन करण्यात आले असून व्यापारी, दुकानदार, उद्योजक, वाहन धारक आणि सर्व समाजबांधवांनी शांततेत बंद यशस्वी करावे,असे आवाहन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्यावर झालेल्या या हल्ल्याने तालुक्याच्या सामाजिक वातावरणाला हादरा बसला असून, आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. आवश्यकता भासल्यास पुढील काळात आणखी तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
*सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; पाटोद्यात संतापाची लाट शनिवारी दिली पाटोदा बंदची हाक*


























