(प्रतिनिधी, सिद्धार्थ तायडे)
छत्रपती संभाजीनगर :’तडवी-भिल्ल आदिवासी जमातीचे सामाजिक-आर्थिक परिवर्तन (जळगाव जिल्ह्याचा संदर्भ)’ या विषयावरील संशोधनासाठी प्रा. प्रकाश प्रल्हाद इंगळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे समाजशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा. प्रकाश इंगळे विवेकानंद कला, स. द. वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे समाजशास्र विषयात अध्यापनाचे काम करत आहेत. आपल्या संशोधनातून त्यांनी तडवी-भिल्ल आदिवासी समुदायात शिक्षणाची निम्न पातळी, शाळा सोडण्याचे अधिक प्रमाण, आर्थिक अडचणी इत्यादी समस्यांवर प्रकाश टाकला असून, तडवींमध्ये शैक्षणिक जागृती, शासकीय योजनांचा प्रभावी प्रसार, आधुनिक शेतीतंत्रज्ञानाचा वापर आणि तडवी भिल्लांच्या संस्कृतीचे दस्तऐवजीकरण यासारख्या महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या आहेत.
प्रस्तुत संशोधनासाठी त्यांना डॉ. संजय साळुंके, वरिष्ठ प्राध्यापक व समाजशास्त्र विभागप्रमुख, तसेच मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांचे मार्गदर्शन लाभले. शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना आणि वडनेर भोलजी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथील ग्रामीण भागातील रहिवासी असलेले प्रा. प्रकाश इंगळे यांनी मिळविलेल्या शिक्षण क्षेत्रातील अत्यूच्य पदवीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या यशाचे श्रेय ते आपले आई वडिलांचे कष्ट व पत्नी निलिमा तसेच कुटुंबियांच्या भक्कम पाठिंब्याला देतात.


























