मी फक्त धर्माशी आणि ईश्वराशी जोडलेला राहीन, असा आपल्या मनाशी संकल्प करा. समोर ईश्वर असताना दुसऱ्या कुणाशी तुम्ही जोडलेले असाल, तर त्याहून मोठा मूर्खपणा दुसरा नाही. तिथे अहंकार कामाचा नाही. स्वतःला ईश्वराशी जोडा. त्याची सुरुवात आजसुद्धा होऊ शकते. फक्त तुमच्या मनाचा निर्धार पक्का हवा, असे प्रतिपादन प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी केले.
प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, तुमच्या मनात इतर स्वप्न का जन्माला येतात, मुलं आई-वडिलांपासून वेगळी का होतात, कुटुंब का विखुरतात, स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याची इच्छा मनात का येते, संस्था का ढासळतात हे तुम्हाला लक्षात येईल की हा सारा अहंकाराचा खेळ आहे. फोडा आणि राज्य करा हेच तत्त्व तुम्हाला सगळीकडे दिसून येईल. माझे अस्तित्व हवे या जाणीवेतून सगळे घडत असते. सागरापासून जो थेंब विलग होऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करू पाहतो, तो कधी वाफ होऊन नाहीसा होतो, हे कळतही नाही. अशी मनिषा धरणारे सगळेच विरून जातात; परंतु भगवान महावीर मात्र शाश्वत आहेत.
प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. पुढे म्हणाले, तुम्हाला जीवनात निःस्वार्थपणे देणारी फक्त तीनच माणसे असतात—ईश्वर, गुरू आणि आई-वडील. इतर सगळ्या ठिकाणी फक्त देणंघेणं असतं. सारे काही व्यावहारिक पातळीवर सुरू असते. त्यामुळे अनेकदा तुम्ही म्हणूनसुद्धा जाता—”मी इतके केले, पण मला काय मिळाले?” तुम्ही कधीतरी आई-वडिलांकडून हे शब्द ऐकले आहेत का? कारण त्यांना फक्त देणे माहीत असते.
प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, पर्युषण पर्व कशासाठी आहे हे समजून घ्या. आपण जे चुकत आहोत, अपराधीपणाने वागत आहोत, त्याची जाणीव करून देण्यासाठी पर्युषण पर्व आहे. त्यांचा स्वीकार करण्यासाठी पर्युषण पर्व आहे. म्हणून जीवनात परिवर्तन घडवू शकणारा हा काळ आहे. माझ्या घरात, कुटुंबात पर्युषण पर्व स्थापित व्हावे असा प्रयत्न करा. स्वतःची चूक मान्य करण्याची, स्वीकारण्याची दृष्टी कुटुंबातील प्रत्येकात निर्माण व्हावी, असा प्रयत्न करा.






















