‘वरद, विघ्नहर्ता, मोरया’सह दहा कृषी केंद्रांना निलंबनाचा दणका!

(श्री महेंद्र बेराड सर,भोकरदन तालुका प्रतिनिधी)
नियम धाब्यावर : कृषी केंद्रचालकांना नोटीस,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

नियम धाब्यावर बसवून जालना कामकाज करणाऱ्या जिल्ह्यातील ३५ कृषी सेवा केंद्रचालकांना कृषी विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सुनावणीनंतर जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील वरद, विघ्नहर्ता, मोरया कृषी सेवा केंद्रांसह एकूण १० केंद्रांवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे यांनी दोन दिवसांपूर्वी निलंबनाची कारवाई केली आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बी-बियाणांची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. कृत्रिम खतटंचाई करणाऱ्यांवर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला होता. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रांची कृषी विभागाच्या पथकाकडून तपासणी केली जात आहे. त्या तपासणीत त्रुटी आढळलेल्या ३५ कृषी सेवा केंद्र चालकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या.
‘या’ दुकानदारांवर कारवाई

तीर्थपुरी येथील वरद कृषी सेवा
केंद्र, विघ्नहर्ता अॅग्रो ट्रेडर्स, मोरया कृषी सेवा केंद्र, श्रीराम कृषी सेवा केंद्र, वरद कृषी सेवा केंद्र अॅण्ड मशिनरी, साई इंटरप्रायजेस या सहा केंद्रांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.
तसेच घनसावंगी येथील धनश्री कृषी सेवा केंद्र, रांजणी येथील कालिका कृषी सेवा केंद्र व मनीषा कृषी सेवा केंद्र, माहोरा येथील माउली कृषी केंद्रावर निलंबनाची कारवाई झाली.
३५ केंद्र
चालकांना कृषी विभागाच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. सुनावणीनंतर त्यातील दहा केंद्रांवर कारवाई झाली आहे.
निलंबित
स्टॉकचीही तपासणी
संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांकडे असलेली खते, बी-बियाणे,किटकनाशकांची तपासणी केली जात आहे. बोगस खते, किटकनाशके आढळली तर कारवाई होणार आहे.
‘या’ आढळल्या त्रुटी
कृषी विभागाच्या पथकांनी केलेल्या तपासणीत या दुकानांमध्ये दर्शनी भागात दर फलक न लावणे, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, विक्रीची बिले न ठेवणे, पॉज मशीनवर विक्री न करणे यासह इतर त्रुटी आढळल्या होत्या.

खरीप हंगामात खते, बी- बियाणांची टंचाई होऊ नये, शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली जात असून, त्रुटी असणाऱ्या केंद्रांवर कारवाई केली जात आहे. यापुढेही ही कारवाई सुरू राहणार आहे.
जी. आर. कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना
इतर केंद्रही रडारवर जिल्ह्यातील इतर कृषी सेवा केंद्रांचीही तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील पथकांकडून तपासणी सुरू आहे.
त्यांनाही नोटीस दिल्या जाणार असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *