ज्ञानासाठी चालतो तो विद्यार्थी : प. पु. प्रवीणऋषीजी म. सा.

 

मनुष्य तोच असतो जो इच्छित स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी चालतो. साधक साध्यासाठी चालतो. एखादा भक्त देवाच्या भक्तीसाठी चालतो आणि विद्यार्थी तोच असतो जो ज्ञानासाठी चालतो. त्यामुळे जी मी काही क्रिया करणार आहे त्यास प्रभू तुमची आज्ञा हवी असे प्रतिपादन प. पु. प्रवीणऋषीजी म. सा. यांनी केले.
परिवर्तन चातुर्मास 20 25 मध्ये आयोजित प्रवचनमालेत ते बोलत होते. प. पु. प्रवीणऋषीजी म. सा. म्हणाले, आज्ञा घेऊन आपली क्रिया कार्य करतात ते आराधक असतात. आज्ञा ग्रहण करणं असतं की आज्ञेमध्ये जगणं म्हणजे गुलामी? याचे उत्तर देताना परमपूज्य प्रवीण ऋषीजी म.सा. म्हणाले आज्ञेच एक गुपित आहे. सर्वसामान्य मनुष्याकडे असणारी शक्ती ही सुप्त स्वरूपात असते. पण प्रभू कडे, गुरूकडे सर्वव्यापी, दैदिप्यमान, लोकांवर प्रकाश आणि प्रभाव टाकणारी अशी शक्ती असते. ती शक्ती जर आपल्याला मिळावी असं वाटत असेल तर त्यांच्या आज्ञेच पालन करणं गरजेचं आहे. कारण आज्ञा देणारा हा कायमच आज्ञा पालन करणाऱ्याला आपले सामर्थ्य देत असतो. म्हणून आज्ञेचा अर्थ परमेश्वराशी त्याच्या शक्तीशी एकरूप होणं हा आहे. आज्ञेविना केलेल्या कार्यात ती शक्ती सामावली नसते. आज्ञा मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे तीन रस जर आपण आपल्या आत ग्रहण केले, त्या ऊर्जेला आपल्या आत सामावून घेतले तर ती शक्ती आपल्या आत अवतणार आहे. ती शक्ती अनंत असते. त्यामुळे आपण आज्ञा पालन करताना सजग असणं आपली क्रिया करताना ती डोळसपणे करणं महत्त्वाचे आहे. प्रत्येक क्रियेमागे आपलं ध्येय निश्चित झालेलं असलं पाहिजे. विचारात स्पष्टता आणि कृतीत प्रयोजन नसेल तर आपण केलेली कृती निरर्थक असते. त्यामुळे जी गोष्ट करायची आहे ती आधी स्वतःशी बोला. आपण करणार असलेल्या कृतीविषयी स्वतःशी संवाद साधा. ती कशी करणार आहोत. हे स्वतःशी स्पष्ट करा. यासाठी स्वतःचे निरीक्षण करणं फार महत्वाचे आहे. समजा मी का आणि चालतो? तर मला इच्छित स्थळी पोहोचायचं आहे. मी का आणि कसा बसतो? तर मला स्वतःची आत्मशुद्धी करायची आहे. याची जाणीव ही सजगता आपल्यात सदैव असणं गरजेचं आहे.
प. पु. प्रवीणऋषीजी म. सा. म्हणाले, स्वतःच्या डोळ्यासमोर जर ध्येयच नसेल तर आपला आत्मा निष्क्रिय अवस्थेत असतो. पण ध्येय निश्चिती केली तर ते पूर्ण करण्यासाठी आत्मा तितकाच जागृत देखील असतो. त्यामुळे स्वतःला एक सवय लावून घेणे गरजेचे आहे, ते म्हणजे कोणतीही कृती करायच्या आधी ध्येय निश्चित केलेलं असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *