पुणे – महाराष्ट्र देशोधारक, जैन समाजाचे महान आध्यात्मिक गुरू आचार्य श्रीमद् विजय रामचंद्रसुरीश्वरजी महाराज यांचा ३४ वा समाधी पर्व सोहळा पुण्यातील गंगाधाम येथील ईशा एमराल्ड सोसायटीत अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. समाधी पर्व हा जैन परंपरेत महत्त्वाचा अध्यात्मिक प्रसंग मानला जातो, जो गुरूंच्या निर्वाणानंतर त्यांच्या आठवणींच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.
या पवित्र प्रसंगी प्रभावक प्रवचनकार आचार्य श्रीमद् कीर्तियशसुरीश्वरजी महाराज यांनी उपस्थित श्रद्धाळूंना मार्गदर्शन करताना सांगितले की –
्न ‘आचार्य श्रीमद विजय रामचंद्रसुरीश्वरजी हे जैन धर्मातील एक तेजस्वी, सत्त्वशील आणि धर्मशास्त्रप्रेमी महापुरुष होते. त्यांनी आत्मशुद्धी, संयम व मोक्षमार्गाचे व्रत आपल्या जीवनातून साकारले. त्यांच्या शिकवणी आजही समाजाला सकारात्मक दिशा देतात.’
महाराजांनी त्यांच्या जीवनातून शिकवलेल्या तीन महान शिकवणी विशेष महत्त्वाच्या ठरतात :
१. संसार सोडावा – म्हणजेच मोह-माया, लोभ, द्वेष यांचा त्याग करावा.
२. संयम धारण करावा – जीवनात शिस्त, अहिंसा, तपश्चर्या यांचा अवलंब करावा.
३. मोक्ष प्राप्तीचा मार्ग अनुसरावा – अध्यात्मिक उन्नती साधून अंतिम सत्याकडे वाटचाल करावी.
समाधी पर्वाच्या निमित्ताने विविध जैन मंदिरांमध्ये धार्मिक प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम, सामूहिक उपासना व ध्यानधारणा यांचे आयोजन करण्यात आले. पुणे व परिसरातील शेकडो श्रद्धाळूंनी या पर्वात भाग घेतला व आपले आध्यात्मिक श्रद्धांजली अर्पण केली.
आचार्य विजय रामचंद्र सुरीश्वर्जी महाराज समाधी पर्व संपन्न






















