शेतकरी जाणो कसे; जीवन जगता

मोट गेली, नाडा गेला,
गेला सौंदर कणा
सहा बैल, नांगर आता,
दिसेल का हो पुन्हा…?
हेल गेला, कासरा गेला,
गेली शर्यत बैल गाडीची.
मोगरी गेली, हातणी गेली,
गेली मळणी धान्याची.
वावडी गेली, उफननी गेली,
गेली धार धान्याची.
भुसारा गेला, कलवड गेला,
गेली इर्जिक नांगराची
वाडगं गेलं, खळं गेलं,
गेली शान झोपाट्याची.
सावड गेली, बलुतं गेलं,
गेली राखुळी गुरांची.
हौद गेला, सारन गेली,
गेली बारव जुनी
वढवान गेलं, रहाट गेलं
शेंदू कसं पाणी ?
मेड गेली, कुड गेला
गेला वासा आढं
कुळव गेला, डुब्बं गेलं
फराड गेलं पुढं
खुरवत गेला, खळं गेलं
चंद्राचं ते तळं गेलं
हरणाची गाडी गेली
मामाची पण माडी गेली
हेल गेला, गंज गेली
करडईचा फड गेला
अंगणात लावलेला
भला मोठा वड गेला
बोरं गेली, जांभळं गेली
गेला रानमेवा
खंबीर होती जूनी पिढी
गावाकडे तेव्हा…!
आता कुठं शोधायच्या
गावाकडच्या वाटा
प्रगतीच्या नावाखाली
मोजू कसा तोटा…?
सांग मित्रा, कधी आता
गावाकडे जायचं
ताटलीत दुध भाकर
चुरून मुरून खायचं
यातले कितीतरी शब्द आपल्याला भविष्यात आठवणारसुद्धा नाहीत.
कदाचित यातील कित्येक शब्द पुढील पिढीला कळणार देखील नाहीत.
पण हा अनमोल मराठी शब्द ठेवा आपण सर्वांनी जतन करायलाच हवा.
शेतकरी दिनाच्या हार्दिक हार्दिक जय जगदंब.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *