पुणे – ‘दान करणारे अनेकजण सापडतील, पण जैन धर्माच्या समकक्ष तपश्चर्येचा आदर्श इतर कुठल्याही धर्मात नाही,’ असे प्रभावी प्रतिपादन परम पूज्य प्रवीणऋषिजी म. सा. यांनी केले. ते परिवर्तन चातुर्मास २०२५ अंतर्गत आयोजित प्रवचनमालेत श्रद्धालूंना मार्गदर्शन करत होते.
ते पुढे म्हणाले, ‘जैन तीर्थंकरांनी जे ज्ञान प्राप्त केले, ते ना सहजतेने मिळाले, ना वारसाहक्काने; ते फक्त कठोर तपश्चर्येनेच साध्य झाले. धनसंपत्ती वारशाने मिळू शकते, परंपरेने कोणी राजा होऊ शकतो, पण खरे ज्ञान हे केवळ साधना आणि तपस्येनेच प्राप्त होते.’
प्रवचनात प. पू. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी तपश्चर्येचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी स्पष्ट केले की, ‘तप हा कुठलाही जुनाट धार्मिक संकेत नसून, तो एक अत्युच्च विज्ञान आहे. शरीरशुद्धीसाठी हे सर्वोत्तम साधन असून, तप आणि ध्यान एकत्र असतील, तर त्याचे सामर्थ्य श्रीराम-हनुमानाच्या युतीसारखे असते.’
त्यांनी उदाहरण देत सांगितले, ‘एक कुंभार उत्तम माती घड्याला आकार देऊन भट्टीत जळवतो, तेव्हाच तो उपयोगी ठरतो. तसेच तपाच्या अग्नीतच मनुष्याची साधना परिपक्व होते. ज्ञान, श्रद्धा व गुरुकृपेने बनलेला हा ‘घडा’ जर तपश्चर्येने पक्क झाला, तर त्यात साठवलेले जल कायम शुद्ध राहते. पण कच्च्या घड्यातील जल कीचड बनते.’
अंततः, प. पू. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी सांगितले की, ‘नुसते नामस्मरण, जप, पूजा करणे पुरेसे नाही. त्या मागे जर तपश्चर्येची ऊर्जा नसेल, तर ती साधना अधुरीच राहते.’
तपश्चर्येनेच जीवनाचा खरा आकार घडतो – प. पू. प्रवीणऋषिजी म. सा. यांचे पुण्यात प्रवचन

























