पुणे । दिनांक १५ जुलै २०२५ रोजी स्वर्गीय श्री. राकेश देवीचंद जैन यांच्या एकोणिसाव्या स्मृतिदिनानिमित्त, पूना हॉस्पिटल अ?ॅण्ड रिसर्च सेंटर व जिन कुशल सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ४६व्या रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पूना हॉस्पिटलचे अध्यक्ष श्री. देवीचंद जैन व ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत पार पडले.
या प्रसंगी मॅनेजिंग ट्रस्टी श्री. राजकुमार चोरडिया यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, ‘रक्तदान शिबिराआधी केली जाणारी प्राथमिक तपासणी रक्तदात्यांना त्यांच्या आरोग्याची जाणीव करून देते आणि त्यातून ते स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ लागतात.’
त्यांनी पुढे नमूद केले की, रक्ताचा तुटवडा भासत असताना राकेश जैन मेमोरियल रक्तकेंद्राने केवळ पूना हॉस्पिटललाच नव्हे तर पुणे परिसरातील इतर अनेक रुग्णालयांनाही वेळेवर रक्त व त्याचे घटक पुरवून रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.
डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांच्या काळात, रुग्णांना तात्काळ प्लेटलेट्स, रक्त व आवश्यक रक्तघटकांची तत्काळ उपलब्धता करून देत राकेश जैन मेमोरियल रक्तकेंद्राने समाजातील आरोग्य सेवा अधिक सक्षम केली आहे. या शिबिरात एकूण १०१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले.
या कार्यक्रमात रूग्णालयाचे अध्यक्ष श्री. देवीचंद जैन, मॅनेजिंग ट्रस्टी श्री. राजकुमार चोरडिया, जॉइंट मॅनेजिंग ट्रस्टी श्री. पुरूषोत्तम लोहिया, विश्वस्त श्री. राजेशभाई शाह, श्री. नैनेश नंदू, श्री. भबुतमल जैन, श्री. अशोक ओसवाल, सीईओ डॉ. रवींद्रनाथ, मेडिकल डायरेक्टर ले. कर्नल (नि.) डॉ. गिरीश देशमुख, तसेच जिन कुशल सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश जैन व कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
रक्तदान हीच श्रेष्ठ सेवा — या भावनेतून राकेश जैन यांच्या स्मृतीला मानवंदना अर्पण करणारे हे शिबीर समाजासाठी प्रेरणादायी ठरले.
श्री राकेश जैन यांच्या १९ व्या स्मृती दिना निमीत्त रक्तदान शिबीर






















