लासलगाव:
लासलगाव येथील शिक्षण सहायक मंडळाचे एन.सी.सी. अधिकारी प्रमोद पवार यांना नुकताच मानाचा ‘राज्यस्तरीय बेस्ट ए.एन.ओ. (असोसिएट एन.सी.सी. ऑफिसर) अवार्ड २०२५’ प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रीय छात्र सेना च्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार त्यांच्या उत्कृष्ट कार्याची आणि समर्पित सेवेची पावती आहे.
प्रमोद पवार यांनी मागील अनेक वर्षांपासून एन.सी.सी.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, राष्ट्रप्रेम आणि नेतृत्वगुण वाढवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कॅडेट्सनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांच्या या भरीव कामगिरीची दखल घेऊन एन.सी.सी.ने त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
असोसिएट एनसीसी ऑफिसर वेल्फेअर बोर्ड महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी सन्मान सोहळा रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी कुर्ला, मुंबई येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात दिमाखात पार पडला. एनसीसीच्या माध्यमातून तरुण पिढीला शिस्तबद्ध, जबाबदार व देशप्रेमी घडवणाऱ्या अधिकारी वर्गाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते.
कार्यक्रमाचे आयोजन वेल्फेअर बोर्डाचे अध्यक्ष प्रमोद जगताप, सेक्रेटरी संदीप गोसावी व विश्वनाथ पांचाळ यांनी केले होते. पारितोषिकाचे वितरण ब्रिगेडियर शिरीष ढोबळे, कॅप्टन मनोज भामरे, प्राचार्य सुमन सिंग व वेल्फेअर बोर्डाचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात आणि एन.सी.सी. प्रशिक्षणात पवार यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी ठरले आहे. त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे लासलगाव शिक्षण सहायक मंडळ आणि परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
लासलगावचे एनसीसी अधिकारी प्रमोद पवार यांना ‘बेस्ट ए.एन.ओ. अवार्ड २०२५’

























