पारध ( महेंद्र बेराड)
जालना जिल्ह्य़ातील बुद्रुक येथून एक अत्यंत गंभीर आणि तितकीच उपहासात्मक बातमी समोर आली आहे.
येथील ZP शाळेजवळून जाणाऱ्या गावहद्दीतील मुख्य रस्त्याची स्थिती दयनीय झाली आहे. या चिखलाने भरलेल्या रस्त्यामुळे शाळकरी मुलांच्या आणि ज्येष्ठांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, तर अपघातांची मालिका सुरूच आहे.
या दुरवस्थेचे कारण काय? तर, केवळ प्रशासनाची अनास्था! हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि स्थानिक ग्रामपंचायत या दोन विभागांपैकी नक्की कोणाच्या अखत्यारीत येतो, यावर ‘हद्दी’चा वाद पेटला आहे. दोन्ही विभाग केवळ कागदी घोडे नाचवत एकमेकांकडे जबाबदारी ढकलत आहेत.
प्रशासनाच्या याच प्रशासकीय ढिलाईचा आरसा दाखवण्यासाठी, समाजसेवक महेंद्र बेराड यांनी एक अनोखे पाऊल उचलले. त्यांनी आज थेट रस्त्यावर *’बेशरम’* चे झाड लावले आणि त्याची पूजा सुरू केली! ज्या प्रशासनाला आपल्या कर्तव्याची लाज वाटत नाही, त्यांच्यासाठी हे प्रतीकात्मक आंदोलन आहे. बेराड यांचा थेट आरोप आहे, की हा वाद म्हणजे प्रशासकीय अनास्थेचा कळस आहे.
महेंद्र बेराड यांची स्पष्ट भूमिका आहे: जोपर्यंत हे दोन विभाग एकत्र येऊन जबाबदारी निश्चित करत नाहीत, नाल्याचे बांधकाम सुरू करत नाहीत, तोपर्यंत ही ‘बेशरम’ पूजा आम्ही दररोज करणार!
या गंभीर प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन, हा गावहद्दीतील महत्त्वाचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी गावकरी करत आहे.


























