पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा येथील केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेने नुकताच एक अतिशय अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला. वाढदिवस नेहमी माणसांचा साजरा होतो, पण या शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी चक्क एका वटवृक्षाचा वाढदिवस साजरा करून पर्यावरणाबद्दलची आपली बांधिलकी दाखवून दिली.
या अनोख्या वाढदिवस सोहळ्या निमित्त शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम, या वटवृक्षाची पूजा करून त्याला फुलांनी आणि माळांनी सजवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. त्यांनी मिळून वटवृक्षाभोवती ‘हॅपी बर्थडे’ गात टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.यावेळी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, ‘झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, सावली देतात आणि पर्यावरणाचा समतोल राखतात. त्यामुळे झाडांची काळजी घेणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.’या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली आणि त्यांच्या संगोपनाची शपथ घेतली.
हा उपक्रम केवळ एका झाडाचा वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित नव्हता, तर तो पर्यावरणाचे महत्त्व आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निसर्गाप्रती आदर निर्माण करण्याचा एक प्रयत्न होता. पाटोद्यात केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेच्या या उपक्रमाने समाजा समोर एक आदर्श ठेवला असून, इतर शाळांसाठीही तो प्रेरणादायी ठरू शकतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुरेखा खेडकर मॅडम यांनी केले






















