दिंडोरी : (किशोरी मोरे)
मातेरेवाडी (ता. दिंडोरी) : जननायक व क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मातेरेवाडी येथे दिनांक १५ नोव्हेंबर रोजी हरित आणि स्वच्छ शाळा अभियान राबवून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आदिवासी समाजासाठी लढणाऱ्या क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचे स्मरण करत विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
या जयंतीचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी फुलझाडांची भेट देवून ‘हरित अभियानाचा’ संदेश दिला. वृक्षारोपणातून पर्यावरण रक्षणाची जाणीव बालमनात रुजवण्याचा हेतू असून, शाळेच्या सौंदर्यातही भर पडली. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, जबाबदारी आणि संवेदनशीलता निर्माण करण्याला ही कृती उपयुक्त ठरली.
उपक्रमाच्या पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी व माजी विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे स्वच्छता अभियान राबवून परिसरातील कचरा निर्मूलन, स्वच्छता जनजागृती आणि स्वच्छ शाळा – सुंदर शाळा हा संदेश दिला. ‘पर्यावरण राखू, स्वच्छता वाढवू’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या कार्यक्रमासाठी शाळा समिती अध्यक्ष नाना पवार, सार्वजनिक वाचनालय उपाध्यक्ष विक्रम पवार, खजिनदार विजय कोकाटे, सचिव सोमनाथ गांगुर्डे, माजी विद्यार्थी संघ उपाध्यक्ष विक्रांत सुर्यवंशी, ग्रंथपाल सुदर्शन पवार, अंकुश गांगुर्ड, किशोर शार्दुल, घनशाम कडाळे, रमेश खवले आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद शिक्षिका सौ. देवरे मॅडम व सौ. गावित मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ग्रामस्थ, समाजबांधव, पालक व माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.


























