३०० वारकर्‍यांची दाढी-कटिंग मोफत करून विठ्ठलचरणी सेवा

नाभिक समाजबांधवांची बीडमध्ये स्वच्छतेची सेवाबीड : ‘आषाढी एकादशीनंतर पंढरपूर येथून शेगावकडे परतणार्‍या संत गजानन महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांचे बीडकरांनी विविध उपक्रमांतून आदरातिथ्य केले. तर, शहरातील नाभिक समाजबांधवांनी वारकर्‍यांसाठी स्वच्छतेची सेवा दिली. सुमारे ३०० वारकर्‍यांची मोफत दाढी-कंटिंग करून प्रथमच आगळावेगळा उपक्रम राबविला.
आषाढी एकादशीनिमित्त विदर्भ, खान्देश, मराठवाड्यातील विविध दिंड्या, पालखी सोहळा बीड़मार्गे
पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतो. त्यामुळे बीड शहरातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने अल्पाहार, फराळ, भोजन, दररोजच्या गरजेच्या वस्तूंचे वाटप करून सेवाभाव जपतात. तितकाच सेवाभाव आषाढी एकादशीनंतर परतणार्‍या संत गजानन महाराज पालखीच्या सेवेत जपला जातो. बीडमध्ये १७ रोजी आगमनानंतर पालखी श्री खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात मुक्कामी होती. त्यामुळे पालखीतील वारकर्‍यांची आगळीवेगळी सेवा करण्यासाठी नाभिक समाजबांधवांनी त्यांच्या ग्रुपवर पालखीमधील वारकर्‍यांची कटिंग, दाढी करण्यासाठी इच्छुकांना आवाहन केले. त्यानुसार मंदिर परिसरात टेबल, खुर्ची मांडून सेवा देण्यात आली.
बीड येथील खंडेश्वरी मंदिर परिसरात गुरुवारी मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराज पालखीतील वारकर्‍यांची मोफत कटिंग आणि दाढी करून बीड येथील नाभिक समाजबांधवांनी आगळीवेगळी सेवा दिली.
चौकट
साहित्य घेऊन हजर व तत्काळ सेवा
नागेश टाकळकर, अनिल टाकळकर, अरुण टाकळकर, उद्धव टाकळकर, गोविंद टाकळकर, राजू वाघमारे, कैलास काळे, माणिक राऊत, दत्ता राऊत, संजय राऊत, बबलू काळे, अशोक पोपळे, लक्ष्मण काळे, बंडू काळे आदी समाजबांधव साहित्य घेऊन हजर झाले. ३०० वारकर्‍यांची मोफत दाढी व कटिंग केली.
वारकर्‍यांतच पांडुरंग
आषाढी वारीत सहभागी होत विठुरायाला भेटून परतणार्‍या वारकर्‍यांना भोजनसेवा, अन्नदान, आदरातिथ्य बीडकर करतात. परंतु, दोन महिने वारी करणार्‍या वारकर्‍यांच्या स्वच्छेतचाही प्रश्न असतो. त्यामुळे आम्ही दाढी-कटिंग मोफत करून विठ्ठलचरणी सेवा अर्पण केली, याचे समाधान लाभले.
नागेश टाकळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *