लासलगाव येथे नायलॉन मांजामुळे एका युवकाच्या तोंडाला २१ टाके पडल्याची गंभीर घटना घडल्यानंतर लासलगाव ग्रामपंचायत व लासलगाव पोलीस ठाण्याने या विरोधात कडक कारवाईची संयुक्त मोहीम सुरू केली आहे.
घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे आणि ग्रामपंचायत अधिकारी संजय बावीस्कर यांनी रुग्णालयात जाऊन पीडित तरुणाच्या प्रकृतीची विचारपूस केली. या पार्श्वभूमीवर, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाने लासलगाव हद्दीत नायलॉन मांजा विक्री करणारे तसेच वापरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे.
कालपासून पतंग उडवणाऱ्या ८-९ मुलांकडून नायलॉन मांजा जप्त करण्यात आला असून त्यांना मांजा वापरू नये, अशी समज देण्यात आली आहे. ग्रामपंचायत अधिकारी संजय बावीस्कर यांनी सांगितले की, यापुढे नियमभंग करणाऱ्यांविरोधात दंडात्मक तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल.
लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी स्पष्ट केले की, लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायलॉन मांजाची विक्री किंवा वापर करणाऱ्यांविरोधात कोणतीही तडजोड न करता कडक कारवाई केली जाईल.
लासलगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी शहरात नायलॉन मांजा विक्री करणारे तसेच बाहेरून आणून वापर करणाऱ्यांवर संयुक्तपणे लक्ष ठेवून आहेत.
नागरिकांनी आपल्या परिसरात नायलॉन मांजाची विक्री अथवा वापर करणाऱ्यांची माहिती लासलगाव ग्रामपंचायत किंवा लासलगाव पोलीस ठाण्यास कळवावी, असे आवाहन ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सण-उत्सव आनंदाने साजरे करताना कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
नायलॉन मांजा विरोधात लासलगावमध्ये कारवाईचा बडगा


























