मी नव्हे तर सर्वांना मोक्ष मिळावं असे विचार असले तरच क्रांती निश्चित प्रवीणऋषी

पुणे (अभिजित डुंगरवाल )
वैश्विक कर्म किंवा वैश्विक भाग्य बदलू शकत नाही असं कोण म्हणतं? ते वैश्विक भाग्य बदलण्याची क्षमता आणि सामर्थ्य तुमच्यामध्येच आहे, असे प्रतिपादन प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी केले.
परिवर्तन २०२५ चातुर्मासमध्ये आयोजित प्रवचनमालेत त्यांनी आज प्रेरक विचार मांडले. आपण सर्वांनी मिळून सामुदायिक रीतीने आपले ध्येय साध्य करावे. त्यापासून कुणीही वंचित राहू नये या सूत्राभोवती त्यांनी आज आपल्या विचारांची मांडणी केली.
प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. पुढे म्हणाले, मी मोक्ष मिळवेन, मी कर्म निर्जरा व्हावी असा प्रयत्न करेन असा फक्त स्वतःपुरता विचार करू नका. विश्वातील सर्वांना मोक्ष मिळावा, कुणीही वंचित राहू नये असे व्यापक ध्येय डोळ्यांसमोर ठेवा. व्यक्तिगत कर्म आणि वैश्विक कर्म अशी दोन प्रकारची कर्म असतात. त्यातील वैश्विक कर्म हे अधिक सामर्थ्यवान असते. संपूर्ण विश्व हेच ईश्वराचे रुप आहे अशी दृष्टी येणे गरजेचे आहे. संत ज्ञानेश्वरांनी पसायदान सांगताना विष्णू किंवा शंकराचे किंवा अन्य देवाचे नाव घेतले नाही तर ते आता ‘विश्वात्मके देवे’ म्हणाले. त्यांना ती विश्वात्मक व्यापक दृष्टी आणि सामर्थ्य प्राप्त झालेले होते. म्हणूनच त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी आपली जीवनयात्रा थांबवली तरी आज शेकडो वर्षे त्यांच्या नावाचा जयघोष करीत वारी निघते.
प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. पुढे म्हणाले, महात्मा गांधी आणि सशस्त्र क्रांती करणारे क्रांतीकारक यांच्यात एकच फरक होता तो म्हणजे महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळवण्याच्या कार्याला सामुदायिक रुप दिले आणि सगळ्या देशाला सोबत घेतले. जेव्हा तुम्ही सामूहिक प्रयत्न करता तेव्हा वैश्विक सकारात्मक कर्म घडते. वैश्विक कर्म अत्यंत सामर्थ्यशाली असते. समाजात बदल घडवणे हे सामुदायिक कर्म आहे. सर्वजण एकत्र आले तर ते पर्वतालाही हलवू शकतात. त्यामुळे वैश्विक सकारात्मक कर्म उभे करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. एखादा थेंब गोड करण्यापेक्षा सगळा समुद्र गोड केला तर तो थेंब आपोआपच गोड होत असतो. कार्याची व्यापकता महत्त्वाची असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम हे सामुदायिक कार्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी असाच सागर बनवला आहे. चला आपणही स्वप्न पाहूया, आपण सर्व एक होऊ या, पुण्यशाली होऊ या, सिद्ध बनू या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *