नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दिनांक २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीकरिता शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मनपामध्ये उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थिती होऊन मौलिक सूचनांची दखल आयुक्त यांनी घेतली.
बैठकीत शहरातील विविध सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सव सुरळीत व यशस्वीपणे पार पडावा यासाठी मौलिक सूचना मांडल्या. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, माजी नगरसेवक गजानन शेलार, राजेंद्र बागुल, सुरेश दलोड रामसिंग बावरी यांनी परवानगीसाठी एकखिडकी योजना, मिरवणुकीच्या मार्गावरील तसेच मंडप परिसरातील झाडांच्या फांद्यांची छाटणी, उत्सवाच्या काळात शहर परिसर पूर्ण वेळ स्वच्छ ठेवणे गणेश भक्तांना पाण्याच्या पिण्याची व्यवस्था ठीक ठिकाणी करणे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागाची सतर्कता, तसेच वीज परवाना तातडीने उपलब्ध होणे शहरात विविध ठिकाणी लोमकरणाऱ्या तारा उघड्यावर असलेल्या डीपी सुरळीत करणे या संदर्भात सूचना मांडल्या.
यावेळी आयुक्त सौ. मनीषा खत्री यांनी सर्व सूचनांचे स्वागत करून, आगामी दोन दिवसांत महानगरपालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष फिल्ड व्हिजिट करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधतील व गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, स्मिता झगडे, उप आयुक्त अजित निकत, सुवर्णा दखणे, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत यांसह सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.
कल्पेश लचके


























