प्रदुषण मुक्त व पर्यावरण संतुलित हरित नाशिकसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार : मंत्री पंकजा मुंडे

 

नाशिकला स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपुरक नैसर्गिक सौंदर्ययुक्त वातावरण लाभले आहे. हे वातावरण अबाधित राखण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून प्रदुषण मुक्त व पर्यावरण संतुलित हरित नाशिकसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक विभाग नाशिक यांची पर्यावरण व वातारणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, उप सचिव तांत्रिक डॉ .राजेंद्र राजपूत, उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, जळगाव उप प्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत, धुळे उप प्रादेशिक अधिकारी प्रणव पाखले, अहिल्यानगर उप प्रादेशिक अधिकारी चंद्रकांत शिंदे, वैज्ञानिक अधिकारी सुरेश माळी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट गटारांमध्ये किंवा नजीकच्या नद्यांमध्ये सोडले जाते. यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. त्याचप्रमाणे वायू प्रदूषण व धुराड्यांमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे हवामानात प्रदूषण होत आहे. प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व दोषी आढळणाऱ्या कंपन्यांविरोधात योग्य ती दाखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

औद्योगिक व महानगरपालिका परिसरात नागरिकांकडून विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त होतात. त्याअनुषंगाने संबंधित यंत्रणांनी प्रदुषण नियंत्रण, पर्यावरण संरक्षणावर भर देऊन स्थानिक नागरिकांच्या सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी व नदी प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना ही
त्यांनी दिल्या.

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे म्हणाले की, प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून नागरिकांना प्रदूषणमुक्त वातावरण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच उद्योजकानी प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपुरक उद्योगाला प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी प्रदूषण मंडळ क्षेत्रातील प्रदूषण, सांडपाणी आदीबाबत केलेल्या उपाययोजनांबाबत स्लाइडद्वारे माहिती दिली.

(कल्पेश लचके)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *