सहकार क्षेत्रात श्रीमंत पेशवे पतसंस्था चे ग्रामीण भागात अभूतपूर्व योगदान माणिकराव कोकाटे

सिन्नर (कल्पेश लचके )श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, डुबेरे यांच्या शाखा क्रमांक ९ चा उद्घाटन सोहळा सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील म्हसोबा मंदिर शेजारी, कीर्तंगळी रोड या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा, युवक कल्याण व अल्पसंख्यांक विकास मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार राजाभाऊ वाजे होते. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक व चेअरमन नारायण वाजे यांनी सर्व मान्यवरांचे व सभासदांचे मन:पूर्वक स्वागत केले.संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतल्यास, गेल्या ३४ वर्षांत संस्थेने नऊ शाखांची स्थापना केली असून,दोन शाखा विशेष प्रगतीपथावर आहेत. तालुकास्तरावर सुरू झालेली ही संस्था आता विभागीय कार्यक्षेत्रात कार्यरत असून सहकार विभागाने यास अधिकृत मान्यता दिली आहे.आजघडीला संस्थेचे २१ हजारांहून अधिक सभासद असून, २२७ कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी जमा झाल्या आहेत. संस्थेने आतापर्यंत १७७ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले असून एनपीए केवळ ५% च्या आत राखण्यात यश मिळवले आहे.
उद्घाटन प्रसंगी बोलताना मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले, “पतसंस्था ही केवळ आर्थिक व्यवहाराची संस्था नसून ती ग्रामीण भागातील शेवटच्या माणसाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे प्रभावी माध्यम आहे. श्रीमंत पेशवे पतसंस्थेचा कारभार पारदर्शक असून शेतकरी, महिला, उद्योजकांसाठी ही संस्था आशेचा किरण ठरली आहे.”
खासदार राजाभाऊ वाजे यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करताना सांगितले की, “एका छोट्याशा गावातून सुरू झालेली ही पतसंस्था आज २१ हजार सभासदांपर्यंत पोहोचली आहे, हे केवळ आर्थिक प्रगतीचे नव्हे, तर गावाच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. नारायण शेठ वाजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ संस्था नाही, तर संपूर्ण तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.”उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवर, सभासद, ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.

(कल्पेश लचके)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *