#भंडारदरा_धरणाची_शताब्दी

#उद्घाटन_वर्ष__10_डिसेंबर_1926
भंडारदरा धरण – अर्थात विल्सन डॅम अकोले, संगमनेर, राहुरी, राहाता, श्रीरामपूर, नेवासा भागासाठी आजचा दिवस म्हणजे एक ऐतिहासिक क्षण….. आजपासून बरोबर १०० वर्षापुर्वी १० डिसेंबर १९२६ रोजी मुंबई प्रांताचे तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या शुभहस्ते भंडारदरा धरणाचे उद्घाटन करुन लोकार्पण करण्यात आले… आणि पुढील शंभर वर्षांत या भागाच्या झालेला शेती व शेतीपूरक उद्योग, औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, पर्यटन, आर्थिक अशा सर्वागिण उन्नतीच्या तिन पिढ्या साक्षीदार आहेत…. आणि पुढील उज्वल भविष्य सुध्दा !!
हा इतिहास आहे समृद्धी आणि संपन्नतेचे देवदुत असलेल्या अकोले तालुक्यातील, अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाचा !!
भंडारदरा धरणाची कहाणी १८७३ पासून सुरू होते, जेव्हा श्रीरामपूर – राहाता – संगमनेर भागात शेतीसाठी कालवे बांधण्यात आले. या कालव्यांना पाणीपुरवठा व्हावा म्हणून १८७३ मध्ये संगमनेर तालुक्यातील ओझर येथे बंधारा बांधला गेला. आणि या कालव्यांना उन्हाळ्यातही शाश्वत पाणी मिळावे म्हणून नवीन साठवण धरणाचा शोध सुरु झाला. भंडारदरा धरणाची रचना ‘आधी कालवे, मग धरण’ अशा अनोख्या पद्धतीने झाली. ओझर येथील बंधाऱ्यापासून डावा कालवा ७६ किलोमीटर आणि उजवा कालवा ५३ किलोमीटर लांबीचा आहे, ज्यामुळे २३ हजार ७७ हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळतो. १० हजार ८६ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या या भंडारदरा धरणाची एकुण उंची २७८ फूट आहे, आणि त्यासाठी केवळ ८४ लाख १४ हजार १८८ रुपये खर्च झाले. ४७ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र असलेल्या या धरणाने शेतीसाठी पाण्याची सोय केली आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ दिले. भंडारदरा धरण स्थापत्यशास्त्राचे आश्चर्य असून १० डिसेंबर १९२६ रोजी उद्घाटन झालेल्या या धरणाला १० डिसेंबर २०२६ रोजी १०० वर्षे पूर्ण झाले आहेत. सिंचनासाठी बांधले गेलेले हे धरण अनेक चित्रपटांचे आकर्षण केंद्र ठरले आहे आणि आजही दिमाखात उभे आहे.
अकोले तालुक्यातील शेंडी गावाच्या उशाशी उभ्या असलेल्या दोन टेकड्या काळ्या पत्थरात बांधलेल्या भिंतीना जोडल्या गेल्या आणि अनंत काळापासून वाहणारा अमृतवाहिनी प्रवरेचा अवखळ प्रवाह सह्यागिरीच्या कुशीत विसावला… अन भंडारदरा धरणाचा जन्म झाला. तेव्हापासून आजपर्यंत सह्यागिरीच्या पर्वत माथ्यावर धो- धो कोसळणा-या पावसाचे पाणी भंडारदरा धरण आपल्या पोटात घेत आहे.
निसर्गशिल्पांचे देखणे कोंदण लाभलेल्या भांडारद-याचे पाणी जसे शेतात खेळू लागले, तशी समृद्धीची बेट फुलली. सहकारी साखर कारखानदारी उद्योगधंद्याची भरभराट झाली. वर्षेनुवर्षे दुष्काळानं गांजलेल्या भूमिपुत्राच्या उदासवाण्या जीवनात या धरणाच्या पाण्यानं चैतन्याचे रंग भरले.
उत्तर रतनगडाच्या माथ्यावरील रत्नाबाईच्या गुहेत प्रवरा नदी उगम पावते. पुढे शेंडी गावाजवळ बांधलेल्या दगडी भिंतीमुळे भंडारद-याचा हा प्रचंड जलाशय तयार झालेला आहे. अतिशय राकट आणि डोंगराळ भागातील हा जलाशय समुद्र सपाटीपासून २४०० फुट उंचीवर आहे. त्यामुळे देशातील काही मोजक्या, खूप उंचीवरील धरणामध्ये याची गणना होते.
दुष्काळी भागास पाणी देण्याच्या दृष्टीने एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून पावले टाकायला सुरुवात झाली होती. १९०२ च्या सिंचन आयोगाने प्रवरा खो-यात धरण बांधण्या्च्या गरजेवर भर दिला होता. प्रवरा नदीवरील ओझर येथे सन १८७३ मध्ये बांधलेला बंधारा त्या दिशेने उचललेले एक पाऊल म्हणावे लागेल. यापुढे प्रवरा नदीवर लाख येथे बंधारा बांधण्यात आला होता. ओझर बंधा-यातून बारमाही पाणी पुरविणे शक्य व्हावे, यासाठी १९९० च्या दरम्यान म्हाळादेवी (ता. अकोले ) येथे मातीचे साठवण धरण बांधण्याचा प्रस्ताव होता. परंतु त्यावेळी मातीचे धरण बांधणी तंत्रज्ञान फारसे प्रगत नव्हते आणि त्याच वेळी नाशिक जिल्ह्यातील वाघाड हा मातीचा बंधारा फुटल्याने हा प्रस्ताव बारगळला. त्यानंतर रंधा फाॅल, साम्रद दरी, आणि शेंडी येथील जागांचे धरण बांधण्यासाठी सर्व्हेक्षण केले आणि सर्वेक्षणानंतर शेंडीजवळील दोन टेकड्याजवळ जागा निश्चित करण्यात आली.
९ ऑगस्ट १९०७ रोजी भंडारदरा धरणाला तत्कालीन सरकारची मान्यता मिळाली. धरणाच्या बांधकामास प्रत्यक्ष प्रारंभ झाला तो एप्रिल १९१० मध्ये… तत्कालीन चीफ इंजिनिअर ऑर्थर हिल यावेळी उपस्थित होते….. पाण्याखाली बुडालेली एकूण जमीन होती २२ हजार ९०० एकर. जमिनीच्या संपादनासाठी विशेष अधिकारी नेमण्यात आला होता. धरणाच्या बांधकामासाठी स्वतंत्र उपविभागाची निर्मिती करण्यात आली. धरणासाठी आवश्यक यंत्रसामग्री व इतर साहित्य घोटी रेल्वेस्थानकावर उतरविले जाई. तेथून सध्याच्या घोटी – कोल्हार मार्गावरून पोचवण्यासाठी पेंडशेत चिंचोडी ते भंडारदरा असा ४ मैलाचा नवीन रस्ता तयार केला गेला.

धरणाच्या दगडी बांधकामास आवश्यक दगड मिळवण्यासाठी परिसरातच दगडी खाणींच्या जागा निश्चित करण्यात आल्या. चुना मिळण्यासाठी चुन्याच्या घाण्या तयार केल्या. दगड खाणीतून दगड वाहतुकीसाठी ” ट्रामलाईन” टाकण्यात आली होती. तसेच गाढवावरून आणि बैलगाडीनेही दगडाची वाहतूक केली जात होती. धरणात अंशतः पाणी साठू लागल्यानंतर होडीने बांधकाम स्थळावर दगड आणले जात.वासाळी आणि कातळापूर येथे ‘लाईम डेपो’तयार करण्यात आले. धरणाच्या बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा (क्रश सॅंड ) वापर करण्यात आला आहे. ही कृत्रिम वाळू धरण परिसरातच तयार केली जात असे. वाळू नसल्याने दगडाची कच करुन वाळु तयार केली जायची….हळूहळू जसजसे धरणाचे काम पुढे जाऊ लागले. तसा भंडारद-याचा शांत परिसर गजबजून गेला. अधिकारी, मजूर यांची निवासस्थाने उभी राहिली. निसर्गाच्या कुशीत भौतिक जगापासून कोसो योजने दूर असलेल्या या भागात दूरध्वनी, टपाल, दवाखाने अशा मुलभूत सोयी सुविधा आल्या. त्यावेळच्या लोकांना याचे केवढे कुतूहल वाटत होते.
भंडारदरा धरणाच्या भिंतीच्या बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण काम दगड आणि चुन्यात करण्यात आले. वाळू उपलब्ध नसल्याने दगडांचा चूरा वाळू म्हणून वापरण्यात आला. थोडे थिडके नव्हे तब्बल १ कोटी २६ लाख ४ हजार १४० घनफूट बांधकाम करावयाचे होते. जसजसे बांधकाम उंची गाठत होते, तसे पाणी अडविण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर १९२० मध्ये धरणात २०० फुट उंचीपर्यंत पाणी साठवले होते. त्याच वर्षी सन १९२० मध्ये धरणातून सिंचनासाठी नदीपात्रात पहिल्यांदाच पाणी सोडण्यास सुरुवात झाली….आणि समग्र परीवर्तनाची नांदी झाली…. बांधकामाने पुढे चांगलाच वेग घेतला होता. नियोजनाप्रमाणे भिंतीची उंची २५० फुटापर्यंत बांधण्याचे ठरले होते. पुढे त्यात बदल केला गेला. ही उंची २० फुटांनी वाढवून २७० फुट करण्यात आली. भिंतीत एकूण चार मो-या असून,त्या अनुक्रमे ७० फुट, १२० फुट, १७० फुट व २२० फुट अशा अंतरावर आहे. या मो-यांचे अर्धा फुट जाडीचे व्यास ३ फुट पाईप आणि त्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक झडपा खास इंग्लंडमधून आणण्यात आल्या.भंडारदरा धरणाचे बांधकाम हे स्थापत्य शास्त्राचा एक चमत्कार आहे. स्वित्झर्लंडमधील व्हॉल्व्ह्स आणि गूळ-चुन्याचा वापर करून बांधलेल्या या धरणाच्या खडकाची दाब सहन करण्याची क्षमता ७ हजार मेट्रिक टन आहे. धरणाच्या बुडीत पाणलोट क्षेत्र २१ किलोमीटर लांब आहे, आणि पाण्याचा ६० टक्के दाब जवळच्या टेकडीवर स्थिरावतो, तर केवळ ४० टक्के दाब भिंतीवर येतो. या अभियांत्रिकी तंत्रामुळे धरणाची मजबुती टिकून आहे. कोकणात पाणी वाहून जाऊ नये म्हणून ब्रिटिशांनी साम्रदजवळ ३५० मीटर लांबीचा सॅडल डॅमही बांधला. या सर्व वैशिष्ट्यांमुळे भंडारदरा धरण आजही अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. ७१.२८ मीटर भिंतीच्या तळाची रुंदी असून, माथ्यावरील रुंदी ७ मीटर आहे.१९४०-४१ मध्ये धरणाच्या सांडव्यावर पाच साडेपाच फूट उंचीची भिंत बांधण्यात आली. त्यामुळे आता धरणात २६५.७० फूट उंचीपर्यंत पाणी साठवण्यात येते. त्यामुळे धरणाची क्षमता ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट झाली आहे. ऑगस्ट १९१६ मध्ये धरण परिसरात प्लेगचा प्रादुर्भाव झाला. तेव्हा स्वतंत्र डॉक्टर व प्लेग इन्स्पेक्टरची नेमणूक करण्यात आली होती. १९१८-१९ या वर्षात जिल्ह्यात मोठा दुष्काळ पडला. या कसोटीच्या काळात भंडारदरा धरणाने सुमारे ८ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देत मोठा आधार दिला.
जून १९२६ मध्ये धरणाच्या दगडी भिंतीचे काम पूर्ण झाले. त्यासाठी खर्च झाला होता १ कोटी ५० लाख ८३ हजार ४५१ रुपये. अतिरिक्त पाणी वाहुन जाण्यासाठी ६५० फुट रुंदीचा सांडवा दक्षिण बाजूला ठेवण्यात आला. सन १९२६ मध्ये धरणात पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यास सुरुवात झाली. पावसाळा आला. शिखर स्वामिनी कळसुबाई, अलंग, कुलंग, मदन यासह शिंदोळ्या, रतनगड या सह्यागिरीच्या पर्वत माथ्यावर कोसळणा-या पावसांच्या सरीमुळे अवतीर्ण झालेले ओढे – नाले कवेत घेऊन प्रवरामाई पहिल्यांदाच काळ्या पाषाणाच्या भिंतीमुळे सह्यागिरीच्या डोंगरद-यांच्या कुशीत विसावली होती. दि. १० डिसेंबर १९२६ रोजी तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली ओर्मी विल्सन यांच्या हस्ते धरणाचे औपचारिक उदघाटन झाले.
सर्वेक्षणापासून बांधकामात महत्त्वाची भूमिका पार पडलेले तत्कालीन कार्यकारी अभियंता ऑर्थर हिल याचेच नाव धरणाच्या जलाशयाला देण्यात आले. परंतु जवळच असलेल्या भंडारदरा या खेड्याच्या नावावरून धरणास भंडारदरा धरण असेच नाव पडले. मात्र असे असले तरी कागदोपत्री आजही हे धरण विल्सन यांच्याच नावाने ओळखले जाते. या धरणाने उत्तर नगर जिल्ह्याचे चित्रच पालटले. साठवलेले पाणी नियोजन करून लाभक्षेत्रावरील जमिनीला कालव्यांद्वारे मिळू लागले. दुष्काळाने गांजलेल्या भूमिपुत्रांच्या जीवनाला हिरवे वळण मिळाले. ओसाड – उजाड जागेवर हिरवीगार पिके मोठ्या डौलान डोलू लागली. समृद्धी आली.

साखर कारखाने उभे राहिले. उद्योग सुरु झाले. उत्तर नगर जिल्ह्याचा कायापालट झाला.
सारे कसे व्यवस्थित सुरु असतानाच १९६७ मध्ये कोयनेला ६.७ रिस्टर स्केलचा भुकंप झाला. त्याचा परिणाम भंडारदरा धरणावरही झाला आणि १९६९ मध्ये हळूहळू वाढत गेलेल्या तड्यातुन पाण्याची गळती वाढु लागली. धरण बांधले त्या काळात भुकंप प्रतिरोधक बांधकामाचे तंत्रज्ञान प्रगत नव्हते. धरणाची भिंत पाण्याच्या रेट्यामुळे खालील बाजूस कलली गेली आणि १९६७ मध्ये सुक्ष्म स्वरुपात गेलेले तडे पाण्याच्या दाबाने वाढत जाऊन १९६९ मध्ये धरणाला मोठ्या स्वरुपात धोका निर्माण झाला. त्यामुळे काळजीचे वातावरण सर्वत्र पसरले. उच्च प्रतिच्या केबल टाकुन आणि शिसे ओतुन धरणाची भिंत महत्प्रयासाने स्थिर केली १९६९ ते १९७२ या तीन वर्षांत हे काम पूर्ण झाले. अभियंता मनोहर शियेकर यांनी व अन्य तंत्रज्ञांनी जीव धोक्यात घालून अहोरात्र खपून या आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड दिले. १९६९-७२ मध्ये धरणाच्या भिंतीचे बळकटीकरण करण्यात आले. यासाठी १३१ बोअर घेऊन त्यात शिसे ओतण्यात आले, ज्यामुळे भिंतीची दाब सहन करण्याची क्षमता ५४० टनांनी वाढली. तसेच १९४ बोअर घेऊन २१० टन वजनाच्या आणि १० हजार ५५३ फूट लांबीच्या प्री – स्ट्रेस केबल्स टाकण्यात आल्या. १४ बट्रेसेस आणि दोन स्पिल वे गेट बसवण्यात आले, ज्यामुळे प्रति सेकंद ५३ हजार क्युसेक पुराचे पाणी वाहून जाऊ शकते.
भंडारदरा जागेचा धरणाच्या दृष्टीने शोध १९०३ मध्ये ऑर्थर हिल या इंग्रज अभियंत्याने लावला. त्यानंतरचे सर्वेक्षण सहाय्यक अभियंता एच.ओ.बी.पुली यांनी कार्यकारी अभियंता एच. ओ.बी. शौब्रीज यांच्या मार्गदर्शनाखाली केले. पुढे धरण बांधण्याच्या कामास १९१० साली तत्कालीन चीफ इंजिनियर ऑर्थर हिल यांच्या हस्ते सुरु झाले. भंडारदरा हे त्याकाळचे भारतातील सर्वात उंच धरण म्हणून ओळखले जाते. ते चुना, वाळू यांच्या मिश्रणातून बांधण्यात आले. पुढे त्याला आधुनिक तंत्रज्ञानाने आधार देण्यात आला. धरणाचे काम १९२६ साली पुर्ण झाले. १९१० ते १९२६ असा १६ वर्षे बांधकाम कालावधी दिसत असला तरी १९१४ ते १९१८ या दरम्यान पहिले विश्वयुद्ध झाले होते. या युद्धात ब्रिटीश सरकार सहभागी असल्याने धरणाचे काम रेंगाळले गेले. धरणाच्या २०० फुटावरील व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडले असता ते खडकावरून खळखळ वाहत नदीपात्रात झेपावते. त्यावेळी ते दृश्य एखाद्या भव्य छत्रीसारखे दिसते. म्हणून या धबधब्याला अंब्रेला फॉल असे म्हणतात. छत्रीच्या आकाराचे पाणी नदीपात्रात झेपावते तेव्हा पर्यटक भान हरपून ते दृश्य पाहत असतात. धबधब्यातून उडणारे असंख्य तुषार पर्यटकांना चिंब भिजवून टाकतात.
पावसाळ्यात अतिरिक्त पाणी जेव्हा स्पील वे मधून सोडले जाते तेव्हा ते पाणी प्रचंड वेगाने वाहत जाते. ते दृश्य नक्कीच अनेक वर्ष डोळ्यांसमोर तरळत राहते.
भंडारदरा धरण आणि त्याच्या परिसरातील रंधा धबधबा, अम्ब्रेला फॉल यांनी चित्रपटसृष्टीतही आपली छाप पाडली आहे. १९४० पासून आतापर्यंत १०४ चित्रपटांचे आणि ३९ गाण्यांचे चित्रीकरण या परिसरात झाले आहे. १९८५ मधील ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातील ‘तुझे बुलाये ये मेरी बाहे’ हे गीत अम्ब्रेला फॉलजवळ चित्रित झाले, आणि यातून अभिनेत्री मंदाकिनी प्रसिद्धीझोतात आली. मराठी चित्रपट ‘भिंगरी’ मधील ‘सजनी ग भूललो मी, काय जादू झाली’ हे सुषमा शिरोमणी आणि विक्रम गोखले यांचे गीतही धरणाच्या बागेत चित्रित झाले. ‘कुर्बान’, ‘प्रेम’ आणि ‘ये धरती चाँद सितारे’ यांसारखी गाणी रंधा धबधब्याजवळ चित्रित झाली आहेत. या सौंदर्यामुळे भंडारदरा पर्यटकांचेही आवडते ठिकाण बनले आहे.

संक्षिप्त तांत्रिक माहिती….
अधिकृत नाव :
भंडारदरा धरण : विल्सन डॅम
भंडारदरा जलाशयाचे नाव : ऑर्थर लेक
(सन २०२४ मध्ये भंडारदरा जलाशयाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव देण्यात आले आहे )
अडवलेली नदी : प्रवरा
स्थान : शेंडी.
सरासरी वार्षिक पाऊस : ३२२० मिलिमीटर.
उंची : ५०७ मीटर.
रुंदी : (तळाशी) ८२.२९ मीटर
बांधकाम सुरू : १९१०
उद्घाटन दिनांक : १० डिसेंबर १९२६
बांधकाम खर्च : १,१३,९०,०६०
क्षमता : ११ टीएमसी
भौगोलिक माहिती :
अक्षांश १९.५४८२ उत्तर आणि रेखांश ७३.७५७० पुर्व
सांडवा लांबी : १९८.१० मी.
वक्राकार दरवाजे :
दोन दरवाजे आकार १२.५ × ७.९२ मीटर
सर्वोच्च विसर्ग : ५३००० क्युसेक्स
पाणीसाठा : क्षेत्रफळ : १५.५४ चौरस कि.मी.
एकुण साठवण क्षमता : ३१२.५९५ दलघमी (११. ०३९ टिएमसी )
उपयुक्त साठवण क्षमता : ३०४.१० दलघमी ( १०.७३९ टिएमसी)
कालवे….
डावा कालवा लांबी : ७७ कि.मी.

वहन क्षमता : २६.३६ घनमीटर / सेकंद
एकुण कमांड क्षेत्र : ५९६२५ हेक्टर
लागवडीलायक क्षेत्र : ४००९० हेक्टर.
उजवा कालवा : लांबी : ४५ कि.मी.
वहन क्षमता : ६.८२ घनमीटर / सेकंद
एकुण कमांड क्षेत्र : २९८६६ हेक्टर
लागवडीलायक क्षेत्र : २३६५० हेक्टर.
वीज उत्पादन : टप्पा १ (धरण पायथा)
जलप्रपाताची उंची : ६५ मी
जास्तीतजास्त विसर्ग : १९.२६ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : १० मेगावॅट
विद्युत जनित्र : १ X १० मेगावॅट.
वीज उत्पादन : टप्पा २ ( रंधा फाॅल)
जलप्रपाताची उंची :
५० मी जास्तीतजास्त विसर्ग : ७७ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : ३४ मेगावॅट
विद्युत जनित्र : १ X ३४ मेगावॅट
धरण बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
उंची : ८२.२९ मी (सर्वोच्च)
लांबी : ५०७ मी.
तर अशी आहे भंडारदरा धरणाच्या जन्माची सदाबहार, सदाहरीत, सदासतेज, यशदायी, उर्जादायी, उत्कर्षमयी सर्वांगसुंदर कथा… 🙏

श्री. उत्तमराव निर्मळ
सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता
जलसंपदा विभाग
मोबाईल 7276772400
(भंडारदरा प्रकल्प कार्यकाळ २०१२ ते २०१४)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *