प्रतिनिधी -कृष्णा गायकवाड (पिंपळगाव बसवंत)
वाचनालयासाठी साहित्य भेट; समाजप्रबोधनाची नवी ज्योत पेटवणारा उपक्रम
मातेरेवाडी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) — सार्वजनिक वाचनालय मातेरेवाडी येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले. संपूर्ण परिसरात सामाजिक बांधिलकीचा आणि बोधिसत्वांच्या विचारप्रेरणेचा उन्मेष जाणवत होता.
कार्यक्रमाला शिवसेना युवा नेते बापू सोनवणे, प्रकाश जाधव, रोशन जाधव तसेच वाचनालय संचालक मंडळातील विक्रांत सूर्यवंशी, विजय कोकाटे, ज्ञानेश्वर दोडके, विक्रम पवार, अंकुश गांगुर्डे, दर्शन पवार, अजय गांगुर्डे, रोशन कडाळे व राम शेकरे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्य, विचार आणि संविधाननिर्मितीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करून आदरांजली वाहिली.
महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने वाचनालय वृद्धिंगत व्हावे व तरुण पिढीमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी समाजहिताची महत्त्वपूर्ण भेटवस्तू मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या. बापू सोनवणे यांनी वाचनालयासाठी ३ खुर्च्यांची भेट, तर नवनाथ पवार यांनी ११ पुस्तके भेट दिली. याशिवाय नाथकृपा इलेक्ट्रिकतर्फे ७ पुस्तके व संचालक मंडळातील प्रत्येक सदस्याने प्रत्येकी १ पुस्तक अशी मौल्यवान देणगी वाचनालयास प्रदान केली.
या उपक्रमामुळे वाचनालयाचा साहित्यसाठा समृद्ध होत असून विद्यार्थ्यांना व अभ्यासू नागरिकांना अधिक सक्षम सुविधा उपलब्ध होणार आहेत. समाजप्रबोधनासाठी केलेली ही देणगी वाचन संस्कृती वाढविण्याच्या दिशेने अत्यंत मोलाचे पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रम प्रास्ताविक, अभिवादन व कृतज्ञता व्यक्त करणारे उद्गारांनी संपन्न झाला. महापुरुषांच्या प्रेरणेतून ज्ञानाचा दिवा प्रज्वलित ठेवण्याच्या निर्धाराने कार्यक्रमास उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.


























